वाढदिवशी सैनिकांना मदत करा : लतादीदी
By Admin | Updated: September 24, 2016 04:27 IST2016-09-24T04:27:20+5:302016-09-24T04:27:20+5:30
लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला

वाढदिवशी सैनिकांना मदत करा : लतादीदी
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीमेवर लढताना जायबंदी होणाऱ्या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे. २८ सप्टेंबरला लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. सर्व देशवासीयांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन लतादीदींनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून केले आहे. माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान करावे, असे आवाहन लता मंगेशकर यांनी केले आहे.
सैनिकांसाठी आपण जितके करू तेवढे कमीच आहे. देशासाठी आपल्या जिवाची पर्वा न करणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. त्यांच्यासाठी जे शक्य असेल ते करणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. मी माझ्या वतीने आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करीत आहे. तुम्हीदेखील यामध्ये योगदान दिले तर तुमचे उपकार असतील.
माझ्या वाढदिवसाला दरवर्षी तुम्ही ग्रीटिंग कार्ड, फुले, मिठाई, केक आठवणीने पाठवता. माझी तुम्हाला विनंती आहे की, या वर्षी तुम्ही हे सर्व न पाठवता सर्व पैसा जवानांसाठी द्या, असे आवाहन लतादीदींनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून केले आहे. (प्रतिनिधी)