‘युवा पिढीने डोळे, कान उघडे ठेवून पोलिसांची मदत करावी’
By Admin | Updated: July 14, 2016 03:51 IST2016-07-14T03:51:35+5:302016-07-14T03:51:35+5:30
मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे व काही समाजविघातक कृत्य घडले अथवा घडत असल्यास पोलिसांना त्वरित पावले उचलणे शक्य व्हावे, यासाठी युवा पिढीने डोळे

‘युवा पिढीने डोळे, कान उघडे ठेवून पोलिसांची मदत करावी’
मुंबई: मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे व काही समाजविघातक कृत्य घडले अथवा घडत असल्यास पोलिसांना त्वरित पावले उचलणे शक्य व्हावे, यासाठी युवा पिढीने डोळे व कान उघडे ठेवून पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.
निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेखालील ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने ‘रिस्पॉन्सिबल युथ सेफर सिटी डायलॉग’ या कार्यक्रमांतर्गत अलीकडेच युवा पिढीचा आणि खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पोलीस आयुक्तांशी खुल्या संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी आयुक्त पडसलगीकर बोलत होते. या मुक्त संवाद कार्यक्रमात ९५ युवक-युवकांनी भाग घेतला.
पोलिसांच्या कामात लोकांचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाले, तरच मुंबई शहर अधिक सुरक्षित होऊ शकेल, यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला व आजच्या ‘स्मार्ट’ तरुण पिढीने यात विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. पावसाळा संपल्यावर शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यात तरुण स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला.
या मुक्त संवादाच्या निमित्ताने वाहतूक नियमांच्या पालनाच्या बाबतीत नागरिकांची बेपर्वाई, तरुणांमधील व्यसनाधिनता, मद्यसेवन करून वाहन चालविणे, तरुणांमध्ये पसरविली जाणारी कट्टरता असे अनेक विषय चर्चिले गेले. विद्यार्थी आणि युवकांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. पोलीस आयुक्तांनी या सर्वांचे म्हणणे मोकळ््या मनाने ऐकून घेतले व काही विपरित घडल्याचे कळविल्यास तत्परतेने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नागरी जीवन आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आयोजक संस्था हाती घेत असलेल्या विविध उपक्रमांचे पडसलगीकर यांनी कौतुक केले, तसेच महिला पोलिसांच्या वॉशरूम व रेस्टरूम्सची स्थिती काय आहे, याचा अभ्यास करून त्यातील उणिवा निदर्शनास आणून दिल्याबद्दल प्रशंसा
केली. (विशेष प्रतिनिधी)