पुष्पगुच्छऐवजी हेल्मेट द्या भेट!
By Admin | Updated: April 23, 2017 02:11 IST2017-04-23T02:11:35+5:302017-04-23T02:11:35+5:30
लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित

पुष्पगुच्छऐवजी हेल्मेट द्या भेट!
नाशिक : लग्नसमारंभ अथवा वाढदिवस आदी कार्यक्रम म्हटले की, संबंधितांना आपण पुष्पगुच्छ भेट देतो. परंतु या पारंपरिक पद्धतीला फाटा देत पुष्पगुच्छऐवजी आयुष्य सुरक्षित ठेवणारे हेल्मेट भेट देण्याचा अभिनव उपक्रम नाशिक पोलिसांनी हाती घेतला
असून, ‘लोकमत’च्या वर्धापनदिनाप्रसंगी त्याचा शुभारंभ करण्यात आला.
दुचाकींचे वाढते अपघात व त्यामधील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या शहरात वाढत आहे. यामुळे वाहन चालविताना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘लोकमत’च्या २२ व्या वर्धापनदिनास आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह शुभेच्छा द्यावयास आलेले पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्र कुमार सिंगल यांनी ‘लोकमत’चे सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक व निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्याकडे हेल्मेट सुपुर्द करत उपक्रमाचा शुभारंभ केल्याची घोषणा केली. याप्रसंगी सदर हेल्मेट सिंगल यांच्याच हस्ते छायाचित्रकार नीलेश तांबे यांना प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, जयंत बजबळे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने रस्ता सुरक्षा सप्ताह तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती चालविली आहे.
हेल्मेट न वापरणाऱ्या चालकांवर कारवाई करताना ‘हेल्मेटचे महत्त्व’ या विषयावर निबंध लिहून घेतानाच हेल्मेट वापरणाऱ्या चालकांना चौकाचौकात गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्याचा अनोखा उपक्रमही राबविण्यात आला. (प्रतिनिधी)
प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. ते असे अपघातातून संपू नये, यासाठी दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. आपण लग्नकार्य, वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांना पुप्षगुच्छ व इतर भेटवस्तू देतो. त्याऐवजी आपल्या आप्तेष्टांना अनपेक्षित अपघातांतून जीवनदान देण्यासाठी हेल्मेट भेट देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे.
- डॉ. रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक.