दुचाकीवर मागे बसणा-यासही हेल्मेटसक्ती लागू
By Admin | Updated: February 6, 2016 13:11 IST2016-02-06T13:07:12+5:302016-02-06T13:11:06+5:30
अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तिंना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे.

दुचाकीवर मागे बसणा-यासही हेल्मेटसक्ती लागू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तिंना हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. परीवहन आयुक्तांनी आज शविनारी या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक काढले असून उच्च न्यायालयाने २००३मध्ये दिलेल्या आदेशानुसार दुचाकी वाहनचालक व त्याच्या मागे बसून प्रवास करणारा अशा दोघांसाठी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आल्याचे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे शासनास बंधनकारक आहे. यासाठी दुचाकी खरेदी करतेवेळीच उत्पादक दोन हेल्मेट ग्राहकाला देतील असे निर्देशही परीवहन आयुक्तांनी दिले आहेत.
वाहन नोंदणी अधिका-यानेही वाहनाच्या कागपत्रांसोबत ग्राहकाला दोन हेल्मेट देण्यात आल्याची खातरजमा करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
लोकमतची भूमिका
दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती आणि त्यानुसार परिवहन खात्याने तसे आदेश दिले आहेत.
लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी या भूमिकेचे स्वागत केले असून दुचाकीवर मागे बसणा-यांसदेखील हेल्मेटसक्तीची अमलबजावणी करावी असे सुचवले आहे. दरवर्षी दुचाकींच्या अपघातात लाखो जीव प्राणाला मुकतात, हे लक्षात घेता जनभावनेचा विचार न करता हेल्मेट वापराच्या बाजुने ठामपणे उभे राहण्याचा इरादा विजय दर्डांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यासाठी लोकमत जनजागृतीकरत प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.