मित्रा सलाम!

By Admin | Updated: July 7, 2016 17:19 IST2016-07-07T17:19:39+5:302016-07-07T17:19:39+5:30

मनुष्यबळ विकाससारखं महत्त्वपूर्ण खातं आणि कॅबिनेट दर्जा आमच्या पुण्यातल्या महाविद्यालयीन काळापासून मित्र असलेल्या प्रकाश जावडेकरला मिळालं याचा आम्हाला विशेष आनंद झाला

Hello friends! | मित्रा सलाम!

मित्रा सलाम!

>- सुधीर गाडगीळ
मनुष्यबळ विकाससारखं महत्त्वपूर्ण खातं आणि कॅबिनेट दर्जा आमच्या पुण्यातल्या महाविद्यालयीन काळापासून मित्र असलेल्या प्रकाश जावडेकरला मिळालं याचा आम्हाला विशेष आनंद झाला. मोदींनी प्रकाशला बर्लिनहून बोलावून घेऊन कॅबिनेट दर्जाच नव्हे तर महत्त्वाचं खातं देऊन त्याच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त केला.
वादविवाद - वक्तृत्वाच्या प्रांतात महाविद्यालयीन काळापासून स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवलेला आमचा हा मित्र. पदवीधर मतदारसंघाच्या माध्यमातीम आमदारकी संपादन करत राज्यापूरतं मर्यादित न राहता सलग 15 - 16 वर्षे दिल्लीतच मुक्काम करत, पक्षसंघटनेचं काम करत, पत्रकारितेच्या पार्शवभूमीचा उपयोग करत दिल्लीतल्या बहुभाषी वाहिन्यांच्या पडद्यावरून, पक्षाचा प्रवक्ता म्हणून स्वत:चं स्थान प्रकाशनं निर्माण केलं.
भाजपा सरकारच्या पहिल्याच मंत्रीमंडळात पर्यावरण हे महत्त्वाचं खातं स्वतंत्रपणे सांभाळत, खात्याचा परीपूर्ण अभ्यास करून, सहकाऱ्यांशी आपल्या प्रसन्न मुद्रेन, मुद्देसूद संवाद करत, पर्यावरण भवन सारखी आदर्श वास्तू, आपल्या कामाची साक्ष म्हणून उभी केली. आमच्या पुण्यातल्या पक्षोपक्षाचे प्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, मित्र असलेल्या साऱ्यांना मार्चमध्ये सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून ते भवन दाखवले आणि जणू आपल्या दिल्लीतल्या कर्तृत्वाची झलकच आम्हा जुन्या पुणेरी मित्रांना दाखवली.
त्या दिल्लीभेटीत प्रकाशनं आपल्या बंगल्यावर एका संध्याकाळी गेट टुगेदर ठेवलं होतं. तिथं शरद पवारांपासून, नितिन गडकरी, संजय राऊतांसह साऱ्यांनी हजेरी लावली होती. तिथे प्रकाशची पक्षपलीकडची साऱ्यांची त्यानं मिळवलेली आपुलकी दिसली.
कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता, आक्रस्ताळी विधानं करण्याचे पब्लिसिटी स्टंट चुकूनही न करता, मोदी साहेबांनी सोपवलेली जबाबदारी निष्ठेनं, अठरा अठरा तास काम करत उत्साहानं यशस्वी परदेश दौरे करत, त्यानं आपल्या कामाचा पटच मांडला आणि दोन वर्षे केंद्रीय मंत्रीपदावर असताना केलेल्या कामाची पावतीच प्रकाशला कॅबिनेट दर्जा मंत्रीपदाची भेट देऊन मिळाली.
यशाचे टप्पे गाठत असताना, 40 वर्षांपूर्वी आंतरमहाविद्यालयीन स्तरावरील आम्हा वादविवादपटूंच्या ग्रुपला तो विसरलेला नाही. दर 26 जानेवारीला आम्हा वक्तृत्वपटूंचा मेळावा भरतो त्याला तो आवर्जून हजर राहतो. कामाच्या व्यापात व्यस्त झाल्यावरही अजित कारखानीस या जुन्या कॉमन मित्राच्या साथीनं सर्वांच्या टचमध्ये राहतो.
वडील केशवराव (के. कृ) हे कट्टर हिंदूमहासभावादी. केसरीत संपादक विभागात होते. त्या काळातल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात वाढत असताना, जनसंघ - भाजपा विचार प्रसार नोंदवत असताना, जनसंघ - भाजप विचार प्रसार नोंदवत असताना वडिलांच्या राजकीय विचारापेक्षा वेगळी विचारांची मूस सांभाळताना प्रकाश डगमगला नाही. आणिबाणीत तुरुंगातही गेला. चाळीस वर्षांपूर्वी त्यानं आणि मी एकाच दिवशी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तो दिवस मला आठवतो.
 
 
तो महाराष्ट्र बँकेसारख्या सुरक्षित नोकरीचा त्याग करून, बेभरवशी पक्षसंघटनेच्या कार्यात पूर्णवेळ झोकून देण्यासाठी नोकरीमुक्त झाला होता आणि मी किर्लोस्कर ग्रुपच्या मनोहर साप्ताहिकाच्या संपादकीय खात्याचा राजीनामा दिला होता. त्याच्या बँकेच्या दारात त्या संध्याकाळी आम्ही भेटलो.
पक्षात कुठलंही पद मिळण्याची शक्यता दुरापास्त होती. पक्षकार्यकर्ता हे काही उत्पन्नाचं साधन नव्हतं. पक्षाकार्यकर्त्यांचं जाळंस्वत:भोवती उभारून, स्वत:च्या पदरात काही पाडून घेण्याची सूतराम शक्यता नव्हती. घरची इस्टेट नव्हती. तरीही केवळ पक्षनिष्ठा आणि जनसंघाच्या विचाराचं धन या बळावर त्यानं बेभरवशी जगात पूर्णवेळ उतरण्याचा निर्णय घेतला होता. पण आतमविश्वास जबरदस्त होता. माणसं जोडण्याचा सुस्वभाव होता. वाईट स्थितीतही पाठिशी भक्कम असणारी प्राची सारखी साथी होती. त्यामुळे ह्रदयाला भोक असण्याची टांगती तलवार असतानाही अखंड निश्चित नियोजन करत काम करणं आणि आत्मविश्वास यामुळे प्रमोद महाजन, लालकृष्ण आडवाणी (रथयात्रा नियोजनाकरता) अशा ज्येष्ठांशी नातं बांधत गेला. आणि आज या तपाला फळ मिळालं.
 
 
प्रकाश जावडेकरांचं सुधीर गाडगीळ यांनी काढलेलं रेखाचित्र
 
मूळात असलेल्या या निष्ठेच्या जोडीला, प्रसन्न संवाद करत, राष्ट्रीय स्तरावर माध्यम प्रतिनिधींशी स्नेह बांधत, स्वत:ची प्रतिमा उंचावत गेला. कुठल्याही वादात न अडकता, राष्ट्रीय पातळीवर झळकत गेला. सौंदर्यदृष्टी असल्याने कलरफूल फ्रेश कपडे पेहनत छोट्या पडद्यावरून वक्तृत्वाच्या साथीने रुजत गेला. मला आठवतंय आणिबाणी नंतरच्या विजयी सभेत, पुलं भाषण वाचण्याचा (की त्यांच्या वतीने बोलण्याचा) मान त्याला मिळाला आणि आज तर तो मोदी सरकारात मानाच्या जागी पोहोचलाय.
 
मित्रा सलाम!

Web Title: Hello friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.