‘चित्री’च्या उंचीचा प्रस्ताव लालफितीतच!

By Admin | Updated: November 2, 2014 23:29 IST2014-11-02T21:55:06+5:302014-11-02T23:29:42+5:30

गडहिंग्लजचा पूर्व भाग : खेडी हक्काच्या पाण्यापासून वंचित

The height of 'Chitri' proposition in red! | ‘चित्री’च्या उंचीचा प्रस्ताव लालफितीतच!

‘चित्री’च्या उंचीचा प्रस्ताव लालफितीतच!

राम मगदूम - गडहिंग्लज -आजरा, गडहिंग्लजसह सीमाभागाला वरदान ठरलेल्या चित्री धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. गडहिंग्लजच्या पूर्वेकडील शेतीला बारमाही पाणी मिळण्यासाठी या प्रस्तावाला नव्या सरकारने त्वरित मंजुरी द्यावी, अशी सीमाभागातील जनतेची आग्रही मागणी आहे.
कृष्णा-गोदावरी लवादानुसार आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांसाठी उपलब्ध पाणी वापरात आणण्यासाठी चित्री धरणाची उंची वाढविण्याचा मुद्दा अजूनही मागे पडला होता. मात्र, अलीकडे राज्यात पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रेंगाळलेला हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  दरवर्षी चित्री धरणक्षेत्रात सरासरी ३०८९ मि. मी. इतका पाऊस पडतो. धरण भरल्यानंतर उर्वरित पाणी वाहून जाते. त्याचा उपयोग पाण्यापासून वंचित गावांना होण्यासाठी चित्री धरणाची उंची वाढविण्याची गरज आहे. गडहिंंग्लजच्या पूर्वेकडील खेड्यांच्या नळ योजनांसाठी दूरवरच्या अंतरावरून पाणी आणावे लागते. चित्रीची उंची वाढल्यास विजेच्या खर्चाची बचत होऊन संबंधित गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.
उंची वाढविल्यानंतर
२२५७ द.ल.घ.फू . पाणीसाठा होईल.
३७५ द.ल.घ.फू. जादा पाणी साठणार
९६० हेक्टर सिंचन क्षमता वाढेल.
(२५,००० एकराला पाणी मिळेल)

चित्री धरणाची सद्य:स्थिती
पाणी साठवणूक क्षमता - १८८२ द.ल.घ.फू.
सिंचन क्षमता - ५८५० हेक्टर (१५ हजार एकर)
लाभक्षेत्र - निलजी बंधाऱ्यापर्यंत
शासनाच्या तिजोरीवर बोजा पडणार नाही
कर्नाटकातील संकेश्वरसह पलीकडील सहा गावांनादेखील शेती व पिण्यासाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, चित्री धरणाची उंची वाढविण्यासाठीचा अंदाजित २५ कोटींचा बोजा महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर पडू नये, यासाठी लाभार्थी कर्नाटक शासनाकडून ही रक्कम घ्यावी, असेही प्रस्तावातून सूचित करण्यात आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव
हिरण्यकेशी काठावरील निलजी बंधाऱ्यापुढील कर्नाटक हद्दीपर्यंतच्या खेड्यांनाही बारमाही शेती व पिण्याचे पाणी मिळावे.
यासाठी चित्री पाटबंधारे मध्यम प्रकल्पाची उंची ३.६० मीटरने वाढवावी, अशी मागणी चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे खास पत्राद्वारे केली आहे.
त्यानंतर माजी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, या प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
बाधित क्षेत्र व पुनर्वसनाचा प्रश्न
३० हेक्टर जमीन बाधित होईल. त्यापैकी दहा हेक्टर वनजमीन असून, उर्वरित २० हेक्टर पैकी आवंडी व आजरा येथील दहा हेक्टर, धनगरवाडीची सहा हेक्टर व राजेवाडीची चार हेक्टर.
आवंडी येथील भावेश्वरी मंदिर बाधित होईल. त्यामुळे नव्याने मंदिर बांधावे लागेल.
धनगरवाड्याकडे जाणाऱ्या २ कि. मी. रस्त्याची नव्याने बांधणी करावी लागेल.
एकाही गावठाणाचे पुनर्वसन करावे लागणार नाही.
१२ गावांना मिळणार पाणी.

Web Title: The height of 'Chitri' proposition in red!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.