मल्ल्यांच्या संपत्तीवर टाच
By Admin | Updated: August 1, 2016 04:07 IST2016-08-01T04:07:26+5:302016-08-01T04:07:26+5:30
मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर विभागाने आणि बँकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी चालविली आहे.

मल्ल्यांच्या संपत्तीवर टाच
मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर विभागाने आणि बँकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची तयारी चालविली आहे. मल्ल्या यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे जुने मुख्यालय किंगफिशर हाऊस, कंपनीच्या कार, कार्यालयांचे फर्निचर, मल्ल्या यांचे अलिशान जेट, गोव्यातील किंगफिशर विला आदी ७०० कोटींच्या संपत्तीचा या लिलावाच्या यादीत समावेश आहे. या संपत्तीच्या लिलावाचा हा दुसरा प्रयत्न आहे. यापूर्वीच्या लिलावातून फार काही निष्पन्न झाले नाही.
विजय मल्ल्या यांच्या खासगी जेट विमानाचा लिलाव सेवाकर विभाग, तर अन्य संपत्तीचा लिलाव बँका करणार आहेत. या बँकांचे किंगफिशर एअरलाइन्सवर किमान ९००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात व्याजाचाही समावेश आहे. यापूर्वीच्या लिलावात बोली लावणारे न आल्याने आता सर्व संपत्तीचे मूल्य काही प्रमाणात कमी करण्यात आले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांचा समूह किंंगफिशर हाऊससह अन्य संपत्तीचा लिलाव करणार आहे. बँकांचा हा समूह ४ आॅगस्टला किंगफिशर हाऊसचा लिलाव करणार आहे. यासाठी किमान मूल्य १३५ कोटी ठेवण्यात आले आहे. विलेपार्लेस्थित १७,००० वर्गफुटात बनलेल्या या संपत्तीसाठी यापूर्वी लिलावात १५० कोटी एवढे मूल्य ठरविण्यात आले होते; पण या मालमत्तेसाठी कोणीही पुढे आले नाही. या बँकांनी १३.७० लाख रुपयांची काही चल संपत्तीही लिलावासाठी ठेवली आहे. ही संपत्ती किंगफिशर हाऊसमध्ये पडली आहे. याचा लिलाव एसबीआय कॅप ट्रस्ट २५ आॅगस्टला करणार आहे. किंगफिशरच्या अन्य मालमत्तेची किंमत गत लिलावात ३६६ कोटी रुपये ठेवण्यात आली होती. ती किंमत आता ३३० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किंगफिशर ब्रँड जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होता तेव्हा त्याचे बाजारमूल्य ४००० कोटी रु. होते.
गोव्यातील किंगफिशर विलाच्या लिलावाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; पण आॅगस्टमध्ये याचा लिलाव होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. याची किंमत अंदाजे ९० कोटी रुपये असू शकते, असे सांगितले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>१७ बँका करणार लिलाव : भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांचा समूह किंंगफिशर हाऊससह अन्य संपत्तीचा लिलाव करणार आहे. बँकांचा हा समूह
४ आॅगस्टला किंगफिशर हाऊसचा लिलाव करणार आहे.
याचा होणार लिलाव
जी संपत्ती लिलावात ठेवण्यात येणार आहे त्यात आठ कारचा समावेश आहे. या महागड्या कारमध्ये टोयोटा, इनोव्हा, होंडा सिटी, होंडा सिविक, टोयोटा कोरोलासह अन्य कारचा समावेश आहे.
प्रत्येक कारची किंमत किमान ९०,००० रुपये ते २.५० लाख रुपयांदरम्यान आहे. आरक्षित मूल्यापेक्षा कमी दरात याची विक्री होणार नसल्याचे सांगण्यात आले.