मुसळधार पावसाने शहराला झोडपले
By Admin | Updated: August 1, 2016 02:39 IST2016-08-01T02:39:21+5:302016-08-01T02:39:21+5:30
शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेने पनवेल शहरासह आजूबाजूच्या परिसराला चांगलेच झोडपून काढले.

मुसळधार पावसाने शहराला झोडपले
पनवेल : शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेने पनवेल शहरासह आजूबाजूच्या परिसराला चांगलेच झोडपून काढले.
शहरातील विविध भागात पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्गावरील पनवेल, कळंबोली परिसरातील तीन लेन पूर्णपणे पाण्यात गेल्या होत्या.
खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल आदी शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचे सुटी असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. ग्रामीण भागालाही पावसाने चांगलेच झोडपले असून गाढी नदी दुथडी भरून वाहत होती.
पनवेल शहरातील पायोनिअर, मिडलक्लास सोसायटी, तालुका पोलीस ठाण्याचा परिसर सखल असल्याने याठिकाणी नेहमीच पाणी साचते. शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. जास्त पाऊस पडल्याने खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालवताना अडथळा येत होता. यासंदर्भात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक शिवदास कांबळे यांनी मुद्दा उपस्थित करून ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र नगरपरिषदेने याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
नगरपरिषदेच्या वतीने २४ तास आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. मात्र पावसाचा जोर वाढताच आपत्कालीन कक्ष देखील सुस्त पडत आहे. कळंबोली परिसरातील सायन-पनवेल महामार्ग, स्टील मार्केट, आरटीओ कार्यालय, खारघर टोल नाका आदी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.
>अपघाताची शक्यता
सायन-पनवेल महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. कोट्यवधी खर्चून उभारलेल्या या महामार्गावर कळंबोली, पनवेल परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. खड्ड्यात पाणी साचल्याने चालकांची वाहन चालवताना तारांबळ उडाली. महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने चालक हैराण झाले होते. कामोठे उड्डाणपूल, एलपी, नेरूळ याठिकाणीच्या उड्डाणपुलासह कोपरा गाव, कळंबोली सर्कल, हिरानंदानी बस स्थानक याठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी झाली होती.
>गाढी नदीला आला पूर
पनवेल : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पनवेल तालुक्यातील गाढी नदीला पूर आला आहे. परिसरातील लहान-मोठे नदी- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे उमरोली गावात येण्या-जाण्यासाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून (फरशी पूल) पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे पाचशे - सहाशे लोकसंख्या असलेल्या उमरोली गावाचा संपर्कतुटला आहे. रविवारी शाळेला सुटी असल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले नाही. मात्र पुलावर पाणी साचल्याने नोकरदार मंडळींना कामावर जाता न आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले.दरवर्षी मुसळधार पावसात फरशी पूल पाण्याखाली जात असून उमरोली गावाचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांना दळणवळणासाठी पूर ओसरण्याची वाट बघावी लागते. गेल्या ६० ते ६५ वर्षांपासून हाच प्रकार सुरू आहे. याठिकाणी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आहे. उमरोली गावातील नवीन पुलाचा प्रस्ताव कित्येक वर्षांपासून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या पुलासाठी जवळपास १ कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे. याठिकाणी मोठ्या उंचीचा पूल कधी होणार, याकडे उमरोलीवासीय नागरिकांचे लक्ष लागून आहे.