कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
By Admin | Updated: June 7, 2015 01:36 IST2015-06-07T01:36:49+5:302015-06-07T01:36:49+5:30
तब्बल आठवडाभर अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मॉन्सूनची आगेकूच कायम असून, आसाम मेघालयाचा बहुतांश भाग, नागालंड-मणिपूर

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे : तब्बल आठवडाभर अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मॉन्सूनची आगेकूच कायम असून, आसाम मेघालयाचा बहुतांश भाग, नागालंड-मणिपूर, मिझोराम व अरुणाचल प्रदेशाचा संपूर्ण भाग मॉन्सूनने व्यापला आहे. येत्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, कर्नाटकासह उर्वरित तामिळनाडू, आंध्रप्रदेश किनारपट्टीचा काही भाग आणि मध्य बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. आता प्रतिक्षा आहे ती मॉन्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची!
यंदा नियोजित वेळेपूर्वी अंदमानात दाखल झालेला मॉन्सून तब्बल आठवडाभर तिथेच रेंगाळल्यामुळे केरळात त्याचे आगमन होण्यास काहीसा विलंब लागला. सध्या मॉन्सूनची समाधानकारक वाटचाल सुरू असून, देशाचा ईशान्य पूर्व भाग मॉन्सूनने व्यापला आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडू भागातही तो दाखल झाला आहे़ साधारणपणे ५ जूनपर्यंत मॉन्सून कोकणात धडकून महाराष्ट्राच्या सीमा भागात दाखल होतो. पण अजूनही त्याचे आगमन झालेले नाही. त्यामुळे आता सर्व जणच मॉन्सूनकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत. दरम्यान काल कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागात पाऊस पडला.
येत्या दोन दिवसात कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़ पुणे व मुंबईत सायंकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)