कापसाला ना अग्रीम बोनस ना हेक्टरी मदत

By Admin | Updated: December 28, 2014 00:40 IST2014-12-27T23:39:47+5:302014-12-28T00:40:05+5:30

आर्थिक ताणामुळे निर्णय विचाराधीन; खडसे यांचे प्रतिपादन.

Heavy help of cotton or no bonus for cotton | कापसाला ना अग्रीम बोनस ना हेक्टरी मदत

कापसाला ना अग्रीम बोनस ना हेक्टरी मदत

विवेक चांदूरकर /अकोला: कापसाला अग्रीम बोनस देण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यानंतर कापसाला हेक्टरी मदत जाहीर करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. आता मात्र शासनावर आर्थिक ताण असल्यामुळे निर्णय विचाराधीन असल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी २७ डिसेंबर रोजी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
कापसाला अग्रीम बोनस देऊ, अशी घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे एका कार्यक्रमात एक महिन्यापूर्वी केली होती. त्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस न देता हेक्टरी मदत देण्याचे संकेत दिले होते. शनिवारी एका कार्यक़्रमानिमित्त महसूलमंत्री एकनाथ खडसे येथे आले असता, याबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
राज्यात सीसीसीआय व कापूस पणन महासंघाच्यावतीने कापसाची खरेदी करण्यात येत आहे. कापसाला शासनाने ४0३0 हमीभाव जाहीर केला आहे. विदर्भातील कापूस हे महत्त्वाचे पीक आहे. यावर्षी अल्प पावसामुळे कापसाच्या उत्पादनात घट आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्वच पिके हातची गेल्यामुळे जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. शासनाने कापसाला अग्रीम बोनस देणार तसेच हेक्टरी मदत देण्याच्या घोषणांमुळे शेतकर्‍यांमध्ये आशा निर्माण झाली होती.
कापसाला अग्रीम बोनस देण्याचा आम्ही विचार करीत असल्याचे मी म्हटले होते. सध्या राज्याची आर्थिक स्थिती मजबूत नाही. आर्थिक ताण वाढत आहे. आर्थिक स्थिती बजबूत झाली तर आम्ही कापसाला अग्रीम बोनस देवू व तशी घोषणा करू, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Heavy help of cotton or no bonus for cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.