सुपरच्या आत बायो मेडिकल वेस्टचा ढीग
By Admin | Updated: January 13, 2015 01:10 IST2015-01-13T01:10:11+5:302015-01-13T01:10:11+5:30
सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली आहे, परंतु शासकीय रुग्णालयांकडून या नियमांचे धिंडवडे निघाले आहेत.

सुपरच्या आत बायो मेडिकल वेस्टचा ढीग
नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात : शासकीय रुग्णालयांतील कचरा भंगारात
सुमेध वाघमारे -- नागपूर
सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली आहे, परंतु शासकीय रुग्णालयांकडून या नियमांचे धिंडवडे निघाले आहेत. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयातून रोज निघणाऱ्या कचऱ्यात ज्याला किंमत नाही तोच कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी पाठविला जात आहे, तर ज्याला किंमत आहे तो कचरा लपवून, साठवून नंतर तो भंगार व्यावसायिकाला विकला जात असल्याचे वास्तव आहे.
लोकमत प्रतिनिधीने सोमवारी मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात या कचऱ्याच्या विल्हेवाटाविषयीची पाहणी केली असता रुग्णालयातील काही सफाई कर्मचारी ते स्वत: तर काही त्यांच्या ओळखींच्या लोकांकडून हा कचरा पोत्यात भरून घेऊन जाताना दिसून आले. धक्कादायक म्हणजे, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर छातीरोग वॉर्डाच्या बाजूला भंगारात विकण्यासाठी काढून ठेवण्यात आलेला बायो मेडिकल वेस्टचा ढीगच आढळून आला.
वेगवेगळ्या शस्त्रक्रियेनंतर निकामी झालेले शरीरातील अवयव किंवा ट्युमर, इंजेक्शन, आयव्ही बॉटल, प्लास्टर, कापूस, बॅण्डेज, सिरिंज, पेशंटशी संपर्कात आलेल्या आणि उपचार करताना वापरलेली प्रत्येक वस्तू बायो-मेडिकल वेस्टमध्ये मोडते. हा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्याचा नियम आहे. यासाठी सुपर हायजेनिक डिस्पोजल संस्थेला याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील काही कर्मचारी रुग्णालयातून निघालेला कचरा विशेषत: शरीरातील अवयव, ट्युमर, कापूस, बॅण्डेज, आदी कचरा या संस्थेला देतात. तर इतर बहुसंख्य कचरा पैशाच्या हव्यासापोटी भंगार व्यावसायिकापर्यंत पोहचवितात.
इंजेक्शनचा ढीग
लोकमत प्रतिनिधीने मेडिकलशी संलग्न असलल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याला भेट दिली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. संवेदनशील असलेल्या छातीरोग विभागाच्या वॉर्डाच्या बाजूलाच रुग्णांच्या संपर्कात आलेली सलाईन, सिरींज, इंजेक्शनचा ढीग लागलेला होता. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता एका कर्मचाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, हा कचरा सुपर हायजेनिक संस्थेला न देता भंगारात विकण्यासाठी काढून ठेवण्यात आला आहे.