'व्हॉटसअॅप'वरील संदेशावरून आरोग्य पथक पोहचले गावात!
By Admin | Updated: October 20, 2016 19:06 IST2016-10-20T16:29:13+5:302016-10-20T19:06:22+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील जनतेच्या सुविधेसाठी 'व्हॉटसअॅप' क्रमांक उपलब्ध करून दिला.

'व्हॉटसअॅप'वरील संदेशावरून आरोग्य पथक पोहचले गावात!
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २० : जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील जनतेच्या सुविधेसाठी व्हॉटस्अॅप क्रमांक उपलब्ध करून दिला. या क्रमांकावर मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथे साथरोग उद्भवल्याचा संदेश येताच, आरोग्य पथक गावात धडकले. यावेळी साथरोग सर्वेक्षण केले असून, एकूण ११ रुग्ण आढळून आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र मेडशी अंतर्गत येणाऱ्या डोंगरकिन्ही उपकेंद्रातील कोळगाव बु. येथे साथरोग उद्भवल्याची माहिती व्हॉटस् अॅपवर आली होती. या माहितीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी नागेश थोरात यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांना सदर संदेशाची माहिती दिली. यावर तातडीने गणेश पाटील यांनी आरोग्य विभागाला कोळगाव बु. येथे चमू पाठविण्याच्या सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.व्ही. मेहकरकर यांनी आरोग्य चमू कोळगाव येथे पाठविल्यानंतर सर्वेक्षणाला सुरूवात केली. साथरोग सर्वेक्षण केले असता, तापाचे चार रूग्ण तर इतर किरकोळ आजाराचे सात रूग्ण आढळून आले.
चार रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात आले. सार्वजनिक नळयोजना विहिरीतील पाण्याचा नमुना घेण्यात आला. कंटेनर सर्वे करण्यात आले असून, टेमीफॉस द्रावण दूषित कंटेनरमध्ये टाकण्यात आले. एकूण कंटेनर सर्वे ८३७ करण्यात आले. यापैकी दूषित कंटेनर ८२ आढळून आले. ब्लिचिंग पावडरचा नमुना घेण्यात आल्याचे डॉ. मेहकरकर यांनी सांगितले.