अधिकाऱ्यांमुळे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: August 3, 2016 01:17 IST2016-08-03T01:17:13+5:302016-08-03T01:17:13+5:30
शहरातील वाढती रोगराई आणि वाढलेले साथीचे आजार असा आरोग्याचा विषय स्थायी समितीत गाजला.

अधिकाऱ्यांमुळे आरोग्य धोक्यात
पिंपरी : शहरातील वाढती रोगराई आणि वाढलेले साथीचे आजार असा आरोग्याचा विषय स्थायी समितीत गाजला. नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने शहरातील आरोग्याची समस्या गंभीर झाली आहे. अकार्यक्षम आरोग्य अधिकाऱ्यांमुळे आरोग्य समस्या गंभीर झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला. तसेच स्वच्छतेचे काम नियमितपणे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्वच्छ संस्थेवर कारवाई करावी, काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली.
स्थायी समितीत आरोग्याच्या विषयावर चर्चा झाली. या वेळी सदस्यांनी आक्रमक मते मांडली. आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते या व्यक्तीबद्दल आक्षेप नसून, आरोग्य विभागाचा कारभार व्यवस्थित नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल, नागरिकांच्या समस्यांबदल प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे. सभेच्या अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. नारायण बहिरवाडे, कैलास थोपटे, धनंजय आल्हाट, संदीप चिंचवडे, अनिता तापकीर, सविता साळुंखे, संजय वाबळे आदी सदस्यांनी सहभाग घेतला. बहिरवाडे म्हणाले, ‘आरोग्याच्या प्रश्न गंभीर आहे. उपाययोजना करण्यात आरोग्य विभाग कमी पडत आहे. या विभागात सक्षम अधिकारी नियुक्त करणे गरजेचे आहे. ’’ कैलास थोपटे यांनी नियमितपणे स्वच्छता होत नसल्याची तक्रार केली. ते म्हणाले, ‘‘काळेवाडी परिसरात स्वच्छ संस्थेचे काम समाधानकारक नाही. त्यांच्याकडून नियमितपणे स्वच्छता होत नाही. नागरिकांना या संस्थेचे कर्मचारीही अरेरावी आणि शिवीगाळ करतात. तुम्हाला कोणाकडे जायचे तिकडे जा, असे सांगितले जाते. कचरा नियमितपणे उचलला जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. अशा ठेकेदारांवर कारवाई करावी. त्यास काळ्या यादीत टाकावे. ’’ साळुंखे म्हणाल्या, ‘‘दंडवते असतानाच आरोग्य विभागाचे काम बिघडले आहे, अशी परिस्थिती नाही. गेल्या पाच वर्षांपासून आरोग्य विभागाचा कारभार व्यवस्थितपणे सुरू नाही. नियोजनाचा अभाव आहे.’’ या वेळी आरोग्य विभागासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करावा, तसेच कचरा उचलण्याचे काम व्यवस्थितपणे न करणाऱ्या संस्थेला काळ्या यादीत टाका, अशी मागणीही सदस्यांनी केली. यावर आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.
महापालिकेच्या सहा प्रभागांत विविध ठिकाणी नागपंचमी साजरी करण्याचा विषय स्थायी समितीने मंजूर केला. याविषयी अनिता
तापकीर यांनी विषय मांडला होता. त्यामुळे संभाजीनगरपाठोपाठ अ, ब, क, ड, इ, फ या प्रभागातील विविध ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होणार आहे. (प्रतिनिधी)
>विदू्रपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
पिंपरी : सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे स्टीकर, पोस्टर यांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. अशा
लोकांवर कारवाई करावी, अशी
मागणी स्थायी समितीत करण्यात आली. त्यावर येत्या आठवडाभरात कारवाई
करून अहवाल सादर करण्याचे आदेश
आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले
आहेत. विद्रूपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे
दाखल करा, असा आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आला.
स्थायी समितीच्या सभेत फ्लेक्स, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे पोस्टर, स्टीकर यांवर चर्चा झाली. बसथांबे, रेल्वेस्थानक, महापालिका इमारती कार्यालयांच्या ठिकाणी विनापरवाना स्टीकर आणि पोस्टर लावण्यात येतात. शहरात किती अनधिकृतपणे फ्लेक्स आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांनी सदस्यांना द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
संजय वाबळे यांनीही फ्लेक्समुळे होणाऱ्या विद्रूपीकरणाचा मुद्दा मांडला. नारायण बहिरवाडे यांनीही विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावर आयुक्तांनी पुढील आठ दिवसांत आढावा घेऊन माहिती द्यावी. तसेच संबंधित विभागाने विद्रूपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना केल्या.(प्रतिनिधी)
>सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिंतीवर विनापरवाना स्टीकर, पोस्टर लावले जातात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. अधिकारी डोळे झाकून आहेत. अधिकारी सुस्तावलेले, निद्रिस्त आहे. अधिकारी आणि कर्मचारी बोगस आहे. त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे चांगले बसथांबेही विद्रूप झाले आहेत. - धनंजय आल्हाट
>शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई व्हायला हवी. चौक किंवा प्रमुख रस्त्यांवर विनापरवाना फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे विद्रूपीकरण होत आहे. ते रोखावे. - संदीप चिंचवडे