वीस हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 02:13 IST2016-08-05T02:13:53+5:302016-08-05T02:13:53+5:30
वायू व जलप्रदूषणामुळे कोपरखैरणे व वाशी परिसरातील जवळपास वीस हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वीस हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
कमलाकर कांबळे,
नवी मुंबई- वायू व जलप्रदूषणामुळे कोपरखैरणे व वाशी परिसरातील जवळपास वीस हजार रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांचा विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. परंतु प्रदूषण रोकण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
ठाणे-बेलापूर रस्त्याच्या एका बाजूला औद्योगिक वसाहत तर दुसऱ्या बाजूला नागरी वसाहती आहेत. यात प्रामुख्याने ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे या नोड्सचा समावेश आहे. औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया न करताच मोठ्या नाल्याच्या माध्यमातून खाडीत सोडले जाते. पावणे एमआयडीसी येथून एक मोठा नाला कोपरखैरणे सेक्टर ११ मार्गे वाशी सेक्टर २८ आणि २९ येथील वसाहतीमधून पुढे खाडीला जावून मिळतो. साधारण चार किमी लांबीच्या व अडीचशे मीटर रुंदीच्या या नाल्याच्या दोन्ही बाजूला नागरी वसाहती आहेत. या वसाहतीतून जवळपास वीस हजार रहिवासी राहतात. विशेष म्हणजे अनेकदा या नाल्यातून प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे हा संपूर्ण नाला प्रदूषित झाला आहे. त्यातून चोवीस तास उग्र वास येत असल्याने त्याचा नागरी आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. तसेच पावणे औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे कोपरखैरणे, कोपरी आणि वाशीच्या काही भागात मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी या परिसरात धुके साचल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. याचा प्रत्यक्ष फटका कोपरखैरणे सेक्टर ११, वाशी सेक्टर २८ व २९ मधील रहिवाशांना बसत आहे. प्रदूषणामुळे श्वसन, दमा, टीबी, कॅन्सर अशा जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. कोपरखैरणे सेक्टर ११ रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत. परंतु त्यालाही एक महिन्याचा कालावधी उलटला तरी त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ पंड्या यांनी सांगितले.