विनयभंग प्रकरणी जेल मधून सुटताच आरोपीने सहकार्याच्या मदतीने पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना आव्हान देणाऱ्या गुन्हेगारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर मध्ये राहणाऱ्या एका यादव नावाच्या तरुणा सोबत झा व त्याच्या मित्राचा २७ एप्रिल रोजी वाद झाला. त्यानंतर टोळक्याने, यादव याच्या घराचा दरवाजा थोठावून त्याला मारहाण करून त्याच्या दोन बहिणीचा विनयभंग केला. यावेळी गर्दी केलेल्या जमावाने झा व त्याच्या साथीदारांना चोप देऊन पिटाळून लावले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल होऊन झा नावाच्या तरुणाला जेल मध्ये जावे लागले.
शुक्रवारी त्याची जेल मधून सुटका झाल्यावर त्याच्या साथीदारांनी धुमधडाक्यात त्याचे स्वागत केले. तसेच विनयभंग केलेल्या मुलीच्या घरा समोर झा व त्याचे साथीदारानीं बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केली. याप्रकाराने परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला गुन्हेगारी टोळक्यांनी आवाहन दिले. झा व त्याच्या टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
जेल मधून सुटून विनायभंग केलेल्या मुलीच्या घरा समोर बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केल्याने, गुंडाना कायद्याची भीती उरली नसल्याची टिका शहरातून होत आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना याबाबत विचारणा केल्यावर, त्यांनी हा प्रकार सोशल मीडियावर बघितला आहे. असे सांगून पोलिसांकडून माहिती घेऊन असा प्रकार झाल्यास, संबंधित गुन्हेगार व टोळक्यावर कारवाईचे संकेत दिले. शहरांत गुन्हेगारीत वाढ झाली असून पोलिसांनी अश्या गुन्हेगारावर कारवाईची मागणी केली आहे.