त्यांनी गरीब मुलात ‘गणेश’ पाहिला
By Admin | Updated: September 27, 2015 01:05 IST2015-09-27T01:05:51+5:302015-09-27T01:05:51+5:30
माणसांमध्ये देव असतो असे केवळ म्हटले जाते. मात्र, ते मानणेही महत्त्वाचे आहे. याचेच अनुकरण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील योगेश मालखरे यांनी केले.

त्यांनी गरीब मुलात ‘गणेश’ पाहिला
मंगेश पांडे, पिंपरी-चिंचवड
माणसांमध्ये देव असतो असे केवळ म्हटले जाते. मात्र, ते मानणेही महत्त्वाचे आहे. याचेच अनुकरण पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील योगेश मालखरे यांनी केले. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना न करता गरीब कुटुंबातील बारावर्षीय मुलामध्ये त्यांनी गणेश पाहिला. या मुलाला गणपती समजून त्याचे स्वागतही करण्यात आले.
काळेवाडी, पिंपरी येथे राहत असलेल्या मालखरे यांच्या घरापासून काही अंतरावर १७ सप्टेंबरला बॅण्ड वाजत येत होता. मालखरे व त्यांच्यासोबत एक मुलगा आणि काही तरुण होते. मात्र, हे काय चाललेय कोणाच्याही लक्षात येत नव्हते. घराजवळ आल्यानंतर पिंपरी
येथील रेल्वे स्थानक परिसरात राहत असलेल्या आकाश पवार या बालगणेशाला गणेशमूर्तीप्रमाणेच औक्षण करून घरी नेण्यात आले. मालखरे कुटुंबीयांनी या मुलातच गणेश पाहून केवळ दहा दिवस नाही, तर त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलत नेहमी त्याची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण गणेशोत्सवामध्ये घरात गणपती बसवितो. आरास, सजावट आणि इतर गोष्टींवर खर्च करतो. हाच खर्च गरजू मुलांसाठी केला, तर एक चांगले सामाजिक कार्य घडेल, या उद्देशाने त्यांनी आकाशला १० दिवसांसाठी घरी आणले. त्याला नवीन पोशाख घेतले, दररोज शाळेतही सोडले.