त्यांनी गाव सोडले; पण मोबाईलने घरी आणले
By Admin | Updated: February 2, 2015 23:56 IST2015-02-02T21:53:46+5:302015-02-02T23:56:55+5:30
त्या दोघांची चित्तरकथा : घरातून गायब झालेल्या अंतवडीच्या मुलांना रांजणगावातून पोलिसांनी घेतले ताब्यात

त्यांनी गाव सोडले; पण मोबाईलने घरी आणले
जगन्नाथ कुंभार -मसूर -दोन अल्पवयीन मुलांनी पळून जाण्यासाठी घर सोडले. मात्र, त्यांचे नशीब फुटले. या काळात त्यांचा मोबाईल हरविला, तळीरामांनी पैसे घेऊन पोबारा केला, ही चित्तरकथा आहे अंतवडी, ता. कऱ्हाड येथील गायब झालेल्या मुलांची. मुलांच्या गायब होण्याने पालक अन् पोलीसही चक्रावले होते. सरतेशेवटी रांजणगाव, जि. अहमदनगर येथून त्यांना ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, अंतवडी येथील ॠत्विक (वय १५) व नीरज (१५) ही दोन्ही मुले घरात कुणालाही न सांगता अचानक गायब झाली होती. त्यामुळे पालकांनी शोधाशोध करूनही सापडली नाहीत. त्यांनी मसूर पोलीस ठाण्यात ‘आमच्या मुलांना कोणी तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे,’ अशी तक्रार दाखल केली. याचे गांभीर्य ओळखून उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांचे एक पथक व सहायक फौजदार प्रकाश कोकाटे यांचे एक पथक त्यांना शोधण्यासाठी तयार केले. पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड, पोलीस नाईक सुधाकर भोसले, सुनील शेलार यांच्या पथकाने मुलांच्या घरी संपर्क साधून प्राथमिक तपास केला असता. नीरजने घरातील दुधाचे अडीच हजार रुपये व मोबाइल गायब झाल्याचे समजले. ॠ त्विक हाही त्याच्याबरोबर गेला आहे; परंतु त्याच्याकडे काही पैसे नाहीत, असे सांगण्यात आले. त्या मुलांनी रांजणगाव येथून केलेल्या मोबाईलच्या आधारेच तपासकामी मदत होऊन मुले आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधला असता, ती दोन्ही मुले काहीही न झाल्याच्या आर्विभावात म्हणाले, ‘ आम्ही २५ जानेवारीला अंतवडी सोडून जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार नेमके कुठे जायचे, हे ठरवले नव्हते. त्यानुसार २६ जानेवारीला सकाळी अकरा वाजता कपडे मोबाइल व पैसे घेऊन कऱ्हाड रेल्वेस्थानक गाठले. दुपारी साडेतीनला पुण्याकडे जाणारी रेल्वे आली आणि त्यामध्ये बसून आम्ही पुणे गाठले. पुणे रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. तेथे मोबाईल चोरीला गेला. पहाटे त्यांना दोन तळीरामांनी गाठले. ‘तुम्हाला काम पाहीजे का?,’ असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘हो’ म्हणून सांगितले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी रांजणगावला जाणाऱ्या रेल्वेत बसले. रेल्वेतूनच यांनी त्या तळीरामांचा मोबाइल घेऊन ‘आम्ही नगरला आहोत, आमचा शोध घेऊ नका,’ असा फोन केला. तळीरामांनी रांजणगाव येथील औद्योगिक वसाहतीत नेले. तेथे रात्र झाल्यावर ती रात्र एका खोलीत काढली. सकाळी तळीरामांनी पैशांची मागणी केली. त्यानुसार त्यांनी तीनशे रुपये दिले. हे पैसे घेऊन तळीराम पसार झाले. आपण फसलो आहोत, हे लक्षात आले व ते दोघेही तेथून पळून तडक रस्त्यावर आले. तोपर्यंत इकडे पालकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मुलांनी पालकांना केलेल्या फोनचा आधार घेत पोलिसांनी तपास केला असता. मुले रांजणगाव येथे आढळून आली.
मुलांच्या फोनमुळे तपासाला गती -अल्पवयीन मुले होती. त्यांचा फोन चोरीला गेला. तरीही त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून फोन केला. या फोनचे लोकेशन सुरुवातीस अहमदनगर दाखवत होते. त्यादृष्टीने तपास करत असतानाच दुसऱ्यांदा त्यांनी केलेल्या फोनचे लोकेशन रांजणगाव दिसून आले. त्यामुळे रांजणगाव पोलिसांची मदती घेऊन मुलांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले,’ असे मत पोलीस उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांनी व्यक्त केले.