फुटबॉलसाठी त्याने सोडले घर !

By Admin | Updated: June 20, 2015 00:26 IST2015-06-20T00:26:49+5:302015-06-20T00:26:49+5:30

बारावीत नापास झाल्याने घर सोडून पळालेल्या एका विद्यार्थ्याचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला फुटबॉलची आवड होती

He left home for football! | फुटबॉलसाठी त्याने सोडले घर !

फुटबॉलसाठी त्याने सोडले घर !

नवी मुंबई : बारावीत नापास झाल्याने घर सोडून पळालेल्या एका विद्यार्थ्याचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याला फुटबॉलची आवड होती आणि वडिलांनी मात्र शिक्षणासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे फुटबॉलमध्ये नाव कमवून दाखवण्याच्या जिद्दीने त्याने घर सोडले होते.
कळंबोली येथे राहणारा १९ वर्षीय मुलगा हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पलता दिघे त्याचा शोध घेत होत्या. हरवलेल्या व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी त्यांचे विशेष पथक गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करत असताना बारावीत नापास झाल्याने तो घर सोडून गेल्याचे समोर आले. तसेच फुटबॉलची आवड असतानाही वडील केवळ शिक्षणाची सक्ती लादत असल्याचेही पोलिसांसमोर आले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सोशल मीडियाचाही वापर करत त्याच्या मित्रांचीही चौकशी करावी लागली. अखेर तो पुणे मगरपट्टा येथे पिझा हट्टमध्ये नोकरीला असल्याचे पोलिसांना समजले. यानुसार पोलिसांनी २८ दिवसांनी त्याचा शोध घेवून कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याने फुटबॉल खेळात नाव कमवण्याच्या जिद्दीने घर सोडल्याचे पोलिसांना सांगितले. विशेष म्हणजे त्याने पुण्यातील नेहरू स्टेडिअममध्ये फुटबॉल प्रशिक्षणासाठी बोलणी देखील केली होती. तर प्रशिक्षणाचे शुल्क भरण्यासाठी त्याने पिझा हट्टमध्ये ९ हजार रुपये महिना पगाराची नोकरी स्वीकारली होती. (प्रतिनिधी)

महाविद्यालयात असतानाही तो फुटबॉलचाही छंद जोपासत होता. अनेकदा फुटबॉल संघातून खेळण्याची संधीही मिळत होती. मात्र घरातून विरोध असतानाही छंद जोपासल्याने व नापास झाल्याने वडील ओरडतील याची त्याला भीती होती. त्यामुळे आॅनलाइन निकाल पाहिल्यानंतर तो घर सोडून गेला होता. घर सोडल्यानंतरही त्याने जिद्द न सोडता फुटबॉलचे प्रशिक्षण सुरूच ठेवले होते. त्याच्या या जिद्दीला पोलिसांनीही सलाम ठोकला आहे.

Web Title: He left home for football!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.