Uddhav Thackeray Ashish Shelar: राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीने वेग घेतलेला असतानाच भाजपला ठाकरेंच्या विरोधात आयता मुद्दा मिळाला आहे. केंद्र सरकारने जेपीसीकडे पाठवलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीने मंजूर केले. पण, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विधेयकाविरोधात मतदान केले. त्यावरूनच कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घेरले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संयुक्त संसदीय समितीने मंजूर केले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सूचवलेल्या सुधारणांच्या शिफारशी फेटाळून लावत हे विधेयक मंजूर करण्यात आले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतही या समितीत होते. त्यांनी विरोधात मतदान केले.
'उबाठाने स्वतःच्या हाताने हिजाब फाडला'
विरोधात मतदान केल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवत भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, "वक्फ कायदा सुधारणेला विरोध करुन उबाठाने आपल्या चेहऱ्यावरचा 'हिजाब'स्वतःच्या हातानेच टराटरा फाडला आणि उबाठा गटाचा असली चेहरा जगासमोर आणला."
"उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत आणि असदुद्दीन ओवेसी यांनी 'एकत्रित' मतदान केले. देशाच्या राजकीय इतिहासात ही काळ्या शाईने लिहावी अशी घटना आहे. श्रीमान उद्धव ठाकरे, यालाच हिंदूंच्या पाठीत 'खंजीर' खुपसणे असे म्हणतात. तुमचा कार्यक्रम जोरात चालू ठेवा. हिंदुला अडवा आणि औरंगजेब फॅन क्लब वाढवा", असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून कोंडी केली आहे.
ठाकरेंविरोधात हिंदू विरोधी प्रचार?
महायुतीत गेल्यापासून भाजपकडून उद्धव ठाकरेंविरोधात सातत्याने हिंदूत्व सोडल्याचा आणि हिंदुत्व विरोधी भूमिका घेतल्याची टीका भाजपकडून होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हाच मुद्दा भाजपने लावून धरला होता.
आगामी मुंबई महापालिकासह इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपकडून या मुद्द्यावर जोर दिला जाण्याचे संकेत मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला ठाकरेंच्या शिवसेनेने विरोध केल्याच्या मुद्द्यावरून आतापासूनच भाजप आक्रमक झाली आहे.