त्याच्याकडून अन्य महिला पोलिसांचाही छळ
By Admin | Updated: December 16, 2014 03:40 IST2014-12-16T03:40:53+5:302014-12-16T03:40:53+5:30
वरिष्ठ अधिकारी महिलेला अश्लील शेरेबाजी करणारा पोलीस निरीक्षक अन्य महिला कॉन्स्टेबलचा छळ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे

त्याच्याकडून अन्य महिला पोलिसांचाही छळ
जमीर काझी, मुंबई
वरिष्ठ अधिकारी महिलेला अश्लील शेरेबाजी करणारा पोलीस निरीक्षक अन्य महिला कॉन्स्टेबलचा छळ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्याच्या चौकीत कार्यरत असलेल्या या तरुणी त्याच्या आमिषाला बळी पडत नसल्याने काही महिन्यांपासून तो त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे सांगण्यात आले.
वरिष्ठ महिला निरीक्षकाबाबत खात्यातील दोघा अधिकाऱ्यांकडून झालेल्या अश्लील शेरेबाजीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली असून, दिवसभर हा चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आता जाग आली असून, या प्रकरणाची चौकशी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत.
पोलीस निरीक्षक ढेपाळेकडून त्याच्या चौकीत काम करीत असलेल्या दोघा महिला पोलिसांचा छळ सुरू आहे. त्यांना बंदोबस्त, वाहनांची वर्दळ असलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक ड्युटी लावणे, रोज चौकीत येऊन हजेरी लावण्याची सक्ती केली जात असल्याचे समजते. महिलेबाबत अश्लील शेरेबाजी करणारा ढेपाळे व सहायक निरीक्षक पाटील सध्या उपनगरातील वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत आहेत. दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेली महिला अधिकारी आणि हा ढेपाळे सहा महिन्यांपूर्वी एका शाखेत नियुक्तीला होते. मात्र त्यांच्यात पटत नसल्याने तेव्हापासून ढेपाळे तिच्याबद्दल इतरांकडे अश्लील व अपमानास्पद वक्तव्य करीत होता. पाटीलला त्याबाबत माहिती असल्याने त्याने एका तिऱ्हाईताशी बोलताना महिला अधिकाऱ्याबद्दल अश्लील वक्तव्य केले. समाज रक्षकांकडून महिला अधिकाऱ्यांबद्दलची अवमानकारक शेरेबाजी निषेधार्थ आहे. याबाबत संबंधितावर भादंवि ३५४ अन्वये गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्यासाठी उद्या पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले जाईल, राज्य महिला आयोगाच्या सदस्या व राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.