बारावीचा मराठीचा पेपर फुटला?
By Admin | Updated: March 3, 2017 05:31 IST2017-03-03T05:31:29+5:302017-03-03T05:31:29+5:30
बारावीचा मराठीचा पेपर गुरुवारी परीक्षेच्या १५ मिनिटे आधीच बारावीच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे

बारावीचा मराठीचा पेपर फुटला?
मुंबई : बारावीचा मराठीचा पेपर गुरुवारी परीक्षेच्या १५ मिनिटे आधीच बारावीच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा पेपर व्हॉट्सअॅपवर कसा आला याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार सायबर सेलकडे आली नसल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली.
गुरुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा मराठीचा पेपर होता. केंद्रात बारावीच्या विद्यार्थ्यांना १० मिनिटे आधीच प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येते. त्यापूर्वीच पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर व्हायरल झाल्याची माहिती समोर आल्याने बोर्ड अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. कोणीतरी प्रश्नपत्रिका हातात पडताच तिचा फोटो काढून ती व्हायरल केल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
याबाबत राज्य शिक्षण मंडळाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याकडे विचारणा केली असता, परीक्षा केंद्रावर मोबाइल आणि इंटरनेट वापरण्यास बंदी आहे. काही पत्रकारांनी व्हॉट्सअॅपवर पेपर सापडल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)