नशाखोर कैद्याचा कारागृहात हैदोस
By Admin | Updated: January 18, 2015 00:59 IST2015-01-18T00:59:05+5:302015-01-18T00:59:05+5:30
नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली. तत्पूर्वी, त्याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून

नशाखोर कैद्याचा कारागृहात हैदोस
अनेकांना मारहाण : अधिकाऱ्यांशी वाद, मोठी घटना टळली
नरेश डोंगरे - नागपूर
नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली. तत्पूर्वी, त्याने तुरुंगातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर आरोप लावले. त्याचा गोंधळ असह्य झाल्यामुळे एकत्रित झालेल्या कैद्यांनी त्याला अक्षरश: सूजेपर्यंत मारहाण केली. येथील मध्यवर्ती कारागृहात घडलेले हे थरारनाट्य संबंधित अधिकाऱ्यांनी पाच-सात दिवसपर्यंत दाबून ठेवले, हे येथे उल्लेखनीय!
नागपूरचे मध्यवर्ती कारागृह अनेक वादग्रस्त घटनांमुळे वर्षभरात राज्यभर चर्चेला आले आहे. या कारागृहात चिकन, मटनच नव्हे, तर दारू, गांजासारखे अमली पदार्थही सहज उपलब्ध होतात. प्रतिबंध असूनही मोबाईलचा सर्रास वापर होतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ‘अर्थपूर्ण कार्यपध्दतीमुळे’ काही कैद्यांना कारागृहात घरच्यासारख्याच सोयीसुविधा मिळतात. त्यामुळे इतर कैद्यांचा तिळपापड होतो. यातून कैद्यांचे एकमेकांसोबत वाद होतात. तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी वाद, एकमेकांवर हल्ले असे प्रकार नेहमीच घडतात. अशाच पैकी अमली पदार्थाची सुविधा मिळवणारा एक कैदी गेल्या आठवड्यात जास्त नशेमुळे बेभान झाला.
घटना घडली मात्र...
या गंभीर घटनेसंदर्भात कारागृह प्रशासनाकडे प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता अनेकांनी माहिती देण्याचे टाळले. एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर घटना घडल्याचे मान्य केले. कैद्याने मारहाण केल्याचे, अधिकाऱ्यासोबत दादागिरी केल्याचेही मान्य केले आणि या घटनेची नोंदवजा तक्रार केल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला. हे करतानाच त्यांनी ही घटना विशेष मोठी नसल्याचेही म्हटले.