फेरीवाले सातनंतर पुन्हा रस्त्यांवर

By Admin | Updated: July 31, 2016 02:19 IST2016-07-31T02:19:58+5:302016-07-31T02:19:58+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

Hawkers again on the streets | फेरीवाले सातनंतर पुन्हा रस्त्यांवर

फेरीवाले सातनंतर पुन्हा रस्त्यांवर


नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत सर्वप्रथम रस्ते आणि पदपथांवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे पदपथ आणि रस्ते पदचाऱ्यांसाठी मोकळे झाले. परंतु महापालिकेच्या या कारवाईचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. कारण फेरीवाले पुन्हा पदपथांवर दिसू लागले आहेत. विशेषत: सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी पदपथांवर फेरीवाल्यांनी बस्तान ठोकल्याचे दिसून येते.
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीअभावी शहरात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. रस्ते, पदपथ, सार्वजनिक जागा आदींवर फेरीवल्यांनी अतिक्रमण केले. त्यांना स्थानिक नगरसेवक व महापालिकेच्या विभाग कार्यालयांकडून अर्थपूर्ण पाठिंबा मिळाल्याने फेरीवाल्यांच्या समस्येने अक्राळ रूप धारण केले. याचा परिणाम म्हणून माहिती व तंत्रज्ञानाच्या या शहराला बकालपण आले. मनमानी पद्धतीने फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. वाहतुकीची समस्या उद्भवली. पदचाऱ्यांची गैरसोय होऊ लागली. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी सर्वप्रथम या प्रश्नाला हात घातला. त्यानुसार एकाच वेळी शहराच्या सर्व विभागांतील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आपल्या कर्तव्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने या मोहिमेला पहिल्यांदाच मूर्तरूप आले. याचा परिणाम म्हणून अवघ्या काही दिवसांतच शहरातील रस्ते व पदपथांनी मोकळा श्वास घेतला. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. असे असले तरी या फेरीवाल्यांनी पदपथ व्यापायला पुन्हा सुरुवात केली आहे. विशेषत: सायंकाळी सात वाजल्यानंतर हे फेरीवाले रस्त्यांवर दिसू लागले आहेत. वाशी सेक्टर ९, १0, सेक्टर १७ या विभागात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण करायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील सेक्टर १५ ते १८, सेक्टर २ ते ६ या परिसरात फेरीवाल्यांनी सायंकाळच्या वेळी आपले बस्तान ठोकल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
>फेरीवाले पदपथांवर पुन्हा अतिक्रमण करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक विभागांत फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथ आणि रस्ते व्यापल्याचे दिसून येते. सायंकाळच्या वेळी वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, नेरूळ, बेलापूर, तुर्भे, सानपाडा आदी परिसरांतील रस्ते आणि पदपथांवर पुन्हा फेरीवाले दिसू लागले आहेत.

Web Title: Hawkers again on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.