'मातोश्री'वर आलेलो त्यावेळी भगवा दहशतवाद विसरलात का ? - शरद पवार
By Admin | Updated: November 10, 2014 17:11 IST2014-11-10T16:41:43+5:302014-11-10T17:11:08+5:30
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी मी मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा भगवा दहशतवाद विसरला होता का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे.

'मातोश्री'वर आलेलो त्यावेळी भगवा दहशतवाद विसरलात का ? - शरद पवार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मालेगाव बाँबस्फोटांच्या वेळी मी भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केला होता असे स्पष्ट करतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी मी मातोश्रीवर गेलो होतो तेव्हा भगवा दहशतवाद विसरला होता का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला विचारला आहे. राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी आम्ही भाजपाला पाठिंबा देत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिल्याने भाजपा आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीविषयी भाजपाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी असे शिवसेनेने रविवारी म्हटले होते. तसेच भगवा दहशतवाद असे म्हणणा-या व वाजपेयींचे सरकार अवघ्या १३ दिवसांमध्ये पाडणा-या शरद पवारांचा तुम्ही पाठिंबा घेणार का असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचार केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. 'महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणाला मतदाना करावे हे इतरांनी आम्हाला सांगण्याची गरज नसून या निर्णय आम्हीच घेऊ असे शरद पवारांनी सांगितले. चौकश्यांना घाबरुन नव्हे तर सरकार स्थिर राहावे यासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्येक वेळी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे नाही, सरकारविरोधात एक सक्षम विरोधी पक्षाची भूमिकाही आम्ही निभावत राहू अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
वाजपेयींचे सरकार पडले त्यावेळी मी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावत होतो, मी माझे काम केले असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले असते तरी आम्ही सत्ता स्थापन करु शकलो नसतो, अशा स्थितीत सरकार पाडून पुन्हा निवडणुका घेणे योग्य ठरले नसते असे मतही पवारांनी मांडले. राज्यात ऊस, कापूस, मका उत्पादक शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण असून राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे अशी सूचनाही त्यांनी केली.