लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामात विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४१ लाखांपर्यंत पोचली आहे. यातून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. योजनेत गहू, हरभरा, रब्बी कांदा पिकांसाठी सहभागाची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे, तर उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठीच्या सहभागाची मुदत ३१ मार्च आहे.
राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना उपलब्ध करून दिली. यंदाच्या रब्बी हंगामातही ही योजना सुरू असून, शेतकऱ्यांनी आतापर्यंत ४१ लाख ९ हजार ७८४ अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वाधिक १३ लाख ५६ हजार ८५३ अर्ज लातूर विभागातील आहेत. त्याखालोखाल १० लाख ३६ हजार १२८ अर्ज छत्रपती संभाजीनगर विभागातून आले आहेत. सर्वांत कमी ६१ अर्ज कोकण विभागातून आले आहेत. गेल्या वर्षी या योजनेत ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज प्राप्त झाले होते.
२९ लाख हेक्टरवरील क्षेत्र संरक्षितआतापर्यंत आलेल्या अर्जांमधून २९ लाख ४० हजार ६८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे, तर १२ हजार ३२८ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना अर्ज करताना केवळ १ रुपया भरावा लागत असून, शेतकऱ्यांच्या आलेल्या अर्जांमधून ४१ लाख ९ हजार ५४२ रुपये जमा झाले आहेत.विमा कंपन्यांना विमा हप्त्यापोटी राज्य सरकारला ७५१ कोटी ८३ लाख रुपये, तर केंद्र सरकारला ४७७ कोटी ३६ लाख असे एकूण १ हजार २२९ कोटी ६१ लाख रुपये द्यावे लागणार आहेत.
जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत ऑनलाइनद्वारे सहभाग नोंदवावा. गेल्या वर्षी सुमारे ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, पुणे