शेतीत मोठी गुंतवणूक हवी

By Admin | Updated: November 26, 2014 00:03 IST2014-11-25T22:17:46+5:302014-11-26T00:03:25+5:30

मुख्यमंत्र्यांचे मत : यशवंत कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

Have a big investment in farming | शेतीत मोठी गुंतवणूक हवी

शेतीत मोठी गुंतवणूक हवी

कऱ्हाड : ‘राज्यातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने असून वातावरणातील बदल हे सध्या सर्वांत मोठे आव्हान आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अवर्षण आदी कारणांमुळे शेती धोक्यात आहे. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे; पण तत्पूर्वी कृषी क्षेत्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील बाजार समितीच्या वतीने आयोजित यशवंत कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आनंदराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, डॉ. दिलीप येळगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, दाजी पवार, उपसभापती सुनील पाटील उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘शेतकऱ्यांना वातावरणाच्या बदलाविरोधात पुढे जावे लागेल. शाश्वत शेतीसाठी प्रयत्न करावे लागतील. राज्य शासनही त्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. ती सिंचनाखाली आणण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे.’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘यशवंतरावांनी पाणी योजना, नवीन पीकपद्धती व शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याच नावाने भरविण्यात आलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यास सक्षम आहे.’
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आधुनिक तंत्रज्ञान व चांगले बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, उत्पादित शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे हे सध्या शासनासमोरील आव्हान आहे. पंजाब, हरियाणापेक्षा महाराष्ट्राचे सिंचनक्षेत्र कमी आहे. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास दुष्काळी परिस्थिती उद्भवते. शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित मदत जाहीर व्हावी. ’
आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. बाजार समितीचे प्रशासक संपतराव गुंजाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

२ हजार ६५ ठिकाणी मंडलनिहाय हवामानयंत्र
‘राज्यात मंडलनिहाय २ हजार ६५ ठिकाणी हवामानयंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे वातावरणातील बदलाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. वातावरणात होणारे बदल शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यास शेतीचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.


प्रदर्शन उपयुक्त
‘यशवंतरावांनी राजकारण, समाजकारण व प्रशासन कसं असावं, याचा वास्तुपाठ दिला. त्यांच्या पुण्यतिथीला बाजार समिती ११ वर्षांपासून हे प्रदर्शन भरवीत आहे. या प्रदर्शनामुळे शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.

‘केंद्राकडून लवकरच दुष्काळाची पाहणी
राज्यातील अनेक गावे दुष्काळात होरपळत आहेत. ती दुष्काळी म्हणून जाहीर होण्यासाठी प्रथम पंचनामे करावे लागतात. त्यानंतर केंद्राची समिती पाहणी करून दुष्काळ जाहीर करते. मात्र, यावर्षी पंचनामे न करता समितीकडून पाहणी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केली होती. केंद्राने त्याला मान्यता दिली असून केंद्रीय कृषी मंत्रालयाची समिती गावांची पाहणी करणार आहे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Have a big investment in farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.