हागणदारीमुक्त चळवळ मंदावली
By Admin | Updated: June 8, 2015 01:37 IST2015-06-08T01:37:09+5:302015-06-08T01:37:09+5:30
स्त्री म्हणजे घरातली लक्ष्मी; पण खेड्यापाड्यांत या लक्ष्मीला प्रात:विधीसाठी रोज पहाटे उघड्यावर जावं लागतं, हे वास्तव आहे. घरात शौचालय हवं, यासाठी अनेक महिलांनी पुढाकार घेतला.

हागणदारीमुक्त चळवळ मंदावली
राजेश शेगोकहर, बुलडाणा
स्त्री म्हणजे घरातली लक्ष्मी; पण खेड्यापाड्यांत या लक्ष्मीला प्रात:विधीसाठी रोज पहाटे उघड्यावर जावं लागतं, हे वास्तव आहे. घरात शौचालय हवं, यासाठी अनेक महिलांनी पुढाकार घेतला. यासाठी वाशिमच्या संगीताबार्इंनी सौभाग्याचं लेणं विकलं. गेल्या महिन्यात अकोला जिल्ह्यातील चैताली उर्फ चंदा गाळके या युवतीच्या लग्नात रूखवतामध्ये तयार शौचालय मिळाले. पश्चिम वऱ्हाडात हागणदरीची समस्या किती गंभीर आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांतील अनेक महिलांनी शौचालय बांधणीसाठी पुढाकार घेऊन महाराष्ट्रासमोर आदर्श उभा केला; मात्र तरीही वाशिमचा अपवाद वगळता शौचालयाचा वापर करण्यामध्ये पश्चिम वऱ्हाड हा मागेच आहे.
आर्थिक व सामाजिक बळ नसताना आपलं घर, गाव ‘निर्मल’ करण्यासाठी खेड्यापाड्यातील अनेक महिला झटताहेत. वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथील संगीता आव्हाळे, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील डिडोळा खुर्दच्या गुंफाबाई पेसाडे, चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील साठीच्या कुशीवर्ताबाई गुलाबराव साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता येथील सुवर्णा आटोळे आणि आता चैताली उर्फ चंदा गाळके या स्वच्छतेच्या आयकॉन म्हणून समोर आल्या आहेत. ज्या महिलांचे काम संपूर्ण राज्यासाठी प्रेरक ठरते, त्यांचा थेट मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होतो; मात्र त्या ज्या जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करतात, त्या जिल्ह्यांमध्ये हागणदारीमुक्तीची चळवळ संथगतीने सुरू असल्याचे वास्तव आहे.