मानसोपचारावरील गोळ्या देऊन हसनैनने घडवले वडवली हत्याकांड
By Admin | Updated: March 12, 2016 14:21 IST2016-03-11T22:16:45+5:302016-03-12T14:21:13+5:30
वडवली हत्याकांडातील १५ पैकी हसनैनसह पाच जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल आज न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला. त्याच्या आईवडिलांसह पत्नी आणि मुलीच्याही रक्तामध्ये क्लोझापाईन

मानसोपचारावरील गोळ्या देऊन हसनैनने घडवले वडवली हत्याकांड
आई, वडील, पत्नी आणि मुलीच्या रक्तात आढळले गुंगीचे औषध
- जितेंद्र कालेकर
ठाणे : वडवली हत्याकांडातील १५ पैकी हसनैनसह पाच जणांच्या रक्ताच्या नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून पोलिसांना प्राप्त झाला. त्याच्या आईवडिलांसह पत्नी आणि मुलीच्याही रक्तामध्ये मानसिक उपचारावरील गोळ्यांचा अंश आढळला आहे. त्यामुळे त्यांच्याच अन्नात मिसळून त्याने सर्वांना बेशुद्ध करून त्यांच्या हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. आई असगडी, वडील अन्वर, पत्नी जबीन आणि मुलगी मुबश्शिरा (४) या सर्वांच्या रक्तात गोळ्यांच्या मिश्रणाचे अंश आढळले. झोप लागण्यासाठी, मानसिक तणाव तसेच शीघ्रकोपी असणाऱ्यांना या गोळ्या दिल्या जातात, अशी माहिती ठाण्यातील एका नामांकित डॉक्टरने दिली. पण, सामान्य व्यक्तीने या गोळ्यांचे सेवन केल्यास त्यांच्यावर याचे विपरीत परिणाम होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या पाच जणांव्यतिरिक्त इतरांच्या रक्ताच्या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे हसनैन याच्या अहवालामध्ये कोणत्याही गोळ्यांचे मिश्रण नसल्याचे आढळले. यावरून, या हत्या करण्यासाठीच त्याने इतरांच्या अन्नामध्ये या गोळ्यांचे मिश्रण मिसळल्याचे स्पष्ट होत असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.