पुण्याची हर्षिता शेट्टी राज्यात प्रथम
By Admin | Updated: June 6, 2015 02:18 IST2015-06-06T02:18:40+5:302015-06-06T02:18:40+5:30
मेडिकल सीईटीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेट्टी हिने १९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पुण्याची हर्षिता शेट्टी राज्यात प्रथम
मेडिकल सीईटी : नागपूरचा अमित दशपुत्र दुसरा
मुंबई/पुणे : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या मेडिकल सीईटीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला़ यामध्ये पुण्यातील हर्षिता शेट्टी हिने १९९ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागपूरचा अमित दशपुत्र १९८ गुण मिळवून दुसरा, तर अकोल्याचा अर्पित जयपुरी हा १९७ गुण मिळवत तिसरा आला आहे़ सीईटीतून प्रवेशासाठी राज्यभरातून ३९ हजार ३२८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
संचालनालयातर्फे ७ मे रोजी सीईटी घेण्यात आली होती. १ लाख ८९ हजार ५० विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. त्यामध्ये १ लाख ४१ हजार २१ मुलींचा समावेश होता. यंदा विदर्भ विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून, १० हजार २३९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. मराठवाड्याचा निकाल २०.८० तर उर्वारित महाराष्ट्राचा निकाल १७.८३ टक्के लागला आहे.
गुणवत्ता यादीनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जूनच्या अखेरच्या आठवड्यात विद्यार्थ्यांकडून पसंती अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राज्यातील ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद या विभागीय प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयात घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना संचालनालयातर्फे संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)