डेंगीसह साथीच्या रोगांमुळे हैराण
By Admin | Updated: August 25, 2016 01:51 IST2016-08-25T01:51:37+5:302016-08-25T01:51:37+5:30
शहरात डेंगीसह साथीच्या रोगांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

डेंगीसह साथीच्या रोगांमुळे हैराण
दौंड : शहरात डेंगीसह साथीच्या रोगांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. साधारणत: डेंगीसह अन्य साथीचे सुमारे ५० च्यावर रुग्ण उपचार घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे आरोग्य पथकाच्या सर्वेक्षणानुसार गेल्या महिन्यात विषाणूजन्य आजाराचे ३० च्या जवळपास रुग्ण होते. मात्र आता रुग्णांची संख्या पूर्णपणे घटली असून डेंगी या आजाराचे निदान मात्र अद्याप झाले नसल्याचे आरोग्य पथकाच्या डॉ. मीना भट्टड यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात हवामानात अचानक बदल झाला. त्यातच शहरातील काही भागांत घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथींच्या रोगांचा फैलाव होत चालला आहे.
त्यामुळे खासगी रुग्णालयात विविध साथींच्या रुग्णांसह डेंगीचे रुग्ण उपचार घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनपातळीवर योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असले तरी नागरिकांनीदेखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, असे नागरिकांनी सांगितले.
दौंड नगर परिषद, प्राथमिक आरोग्य पथक, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य कर्मचारी आणि सुश्रुषा नर्सिंग स्कूल, सुशीला
नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी
यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात साथीच्या रोगांवरील उपाययोजना म्हणून कामकाज केले जात
आहे. (वार्ताहर)
>अद्याप निर्वाळा नाही : तरच ठामपणे सांगता येईल
आरोग्य पथकाच्या प्रमुख डॉ. मीना भट्टड म्हणाल्या, ‘‘२० दिवसांपासून शहरात स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले जात आहे. साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर धुराळणी, फवारणी करण्यात येत आहे. डेंगीचे रुग्ण असल्याचा अद्याप निर्वाळा मिळालेला नाही. रुग्णांची तपासणी करून ती वरिष्ठांकडे पाठवली आहे. त्याचा अहवाल येताच रुग्ण आहेत की नाही, हे ठामपणे सांगता येईल. तरीदेखील साथीच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत चालली आहे.
>डेंगीवर उपाययोजना करावी
दौंड : शहरात डेंगीच्या साथीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत असल्यामुळे यावर उपाय योजना वेळीच करावी, असे निवेदन दौंड भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना देण्यात आले आहे. शहरातील डेंगीच्या साथीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी आपण योग्य ती उपाय योजना करावी; अन्यथा होणारे डेंगीचे आजार यातून होणाऱ्या घाणीचा परिणाम हा दौंड शहरवासीयांना भोगावा लागेल.
डेंगीची शक्यता नाकारता येत नाही
दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात म्हणाले, की शहरात डेंगीचे रुग्ण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील शहरातील काही भागांमध्ये धुराळणी, फवारणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, साथीचे रोग कमी होत चालले आहेत.