‘हरिजनवाडा’चे होणार विद्यामंदिर क्रांतिनगर
By Admin | Updated: March 12, 2015 00:37 IST2015-03-12T00:20:28+5:302015-03-12T00:37:15+5:30
‘लोकमत’चा पाठपुरावा : शिक्षण समितीत मंजुरी; नामांतराचा प्रस्ताव

‘हरिजनवाडा’चे होणार विद्यामंदिर क्रांतिनगर
कोल्हापूर : जिल्ह्णातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे असलेल्या शाळेचे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर शिक्षण प्रशासन ‘जागे’ होऊन नामांतरासाठी धावपळ करीत आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करण्याचा दिलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यामंदिराला ‘हरिजनवाडा’ असे नाव राजर्षी शाहू महाराजांच्या विचार, वारसा, इतिहास असलेल्या जिल्ह्यात असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले. त्यानंतर विविध दलित संघटनांनी नामांतराची मागणी लावून धरली आहे. अजूनपर्यंत नामांतर न केल्याबद्दल शिक्षण प्रशासनावर जोरदार टीका झाली.त्या शाळेला ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नाव द्यावे, अशी मागणी ‘भारिप बहुजन महासंघा’ने केली. याउलट युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली. त्यामुळे शाळेला कोणते नाव दिले जाते, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा आणि संघटनांचा दबाव यामुळे शिक्षण प्रशासनालाही नाव बदलण्याची बुद्धी सुचली आहे. शिक्षण प्रशासनाने नियमानुसार नामांतराचा प्रस्ताव मागून घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘स्थायी’मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळाल्यास नामांतरावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, गेल्या सर्वसाधारण सभेत शाळेचे नामांतर करण्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर सर्व सदस्यांनी नामांतरास मंजुरी दिली. असे असताना पुन्हा सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अशा प्रकारे केवळ कागदी घोडे नाचवीत नामांतरास विलंब होत असल्याचा आरोप काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
विविध संघटनांनी वेगवेगळी नावे देण्याची मागणी केली तरी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडून ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करावे, असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर नामांतराचा आदेश दिला जाईल.
- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)