कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे- बच्चू कडू
By Admin | Updated: April 16, 2017 20:42 IST2017-04-16T20:42:30+5:302017-04-16T20:42:30+5:30
शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकारकडून भाव दिला जात नाही

कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे- बच्चू कडू
आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 16 - शेतात दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकारकडून भाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याने पिकवलेला माल देखील त्याला विकता येत नाही. शेतकऱ्यांविरोधी धोरण ठेवणाऱ्या या सरकारविरोधीही आज शेतकऱ्यांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. या भांडवलशाही सरकारविरोधात आता कट्टर शेतकरीवाद निर्माण झाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार बच्चू कडू-पाटील यांनी केले.
शेतकरी, शेतमजूर, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी शेतकरी शेतमजुरांची आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढलेली सीएम टू पीएम आसूड यात्रा रविवारी कऱ्हाड येथे दाखल झाली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, विक्रम थोरात, साजीद मुल्ला, दीपक पाटील, विश्वास जाधव उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू म्हणाले, या देशाला चांगल्या नेत्याची नाही तर चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे. जो इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवेल. शेतकऱ्यांना एकत्रित करू शकेल. आसूड यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना एकत्रिक करण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी हिताविरोधी निर्णय घेणाऱ्या या सरकारला निर्णय बदलायला लावण्यास भाग पाडणार आहे. आसूड यात्रा हा आमचा ट्रेलर असून, पिक्चर अभी बाकी है. सध्याचे मोदी सरकार हे शेतकरी हिताविरोधी निर्णय घेत आहे. या देशात पिकविणाऱ्याचा विचार न करता खाणाऱ्याचा विचार करणारे हे सरकार आहे.
रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर कर्जमाफी झालीच पाहिजे. सध्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सरकारविरोधी शेतकरी असा संघर्ष निर्माण होतोय. एकीकडे राज्यातील काही आमदार एसीच्या गाडीतून संघर्ष यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू उन्हातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सीएम टू पीएम अशी आसूड यात्रा काढत आहेत. हे सर्व राज्यांतील शेतकरी बघत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाच्या बाजूने लढा उभा करायचा हे त्यांनी ठरवावे.
आसूड यात्रा रविवारी कऱ्हाड येथे आली. यावेळी कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर दत्त चौकात आमदार बच्चू कडू यांचे बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी स्वागत केले. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आमदार बच्चू कडू यांची जाहीर सभा पार पडली.
मुख्य अभियंत्यांना तलावात बुडवू
वारणा धरणात मुबलक पाणी असतानाही प्रशासन व राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे वाकुर्डे उपसा योजनेचे वाटोळे झाले आहे. प्रशासनाने ही योजना २०१३ मध्ये २६५ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वाकडे आणली. मात्र, काही गोष्टींसाठी ही योजना बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे धरणात पाणी असूनही ते शेतकऱ्यांना दिले जात नाही. प्रशासनाने तत्काळ ही योजना सुरू करावी, तसेच दक्षिण मांड नदीत पाणी सोडावे अन्यथा वाकुर्डे योजनेचे मुख्य अभियंता व सांगली पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता यांना वाकुर्डे तलावात बुडवू, असा इशारा बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
चव्हाण कुटुंबीयांची घेतली भेट
कऱ्हाडला येण्यापूर्वी आमदार बच्चू कडू यांनी वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथील आत्महत्या केलेल्या जगन्नाथ चव्हाण व विजय चव्हाण या शेतकरी बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेतली. चव्हाण कुटुंबावर झालेला आघात खूप मोठा असून, त्यातून सावरण्यासाठी व त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वत: संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागणार आहे, असे आश्वासन आमदार कडू यांनी यावेळी दिले. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, बी. जी. पाटील आदींसह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनातील बोक्यांवर आसूड उगारा !
सहपालकमंत्री सदाभाऊ खोत हे प्रशासनाच्या वारंवार बैठका घेऊन शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आश्वासन देत आहेत. एकीकडे या प्रशासनाने मार्च २०१२ पासून पश्चिम महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना साधे विजेचे कनेक्शनसुद्धा दिलेले नाही. अशा प्रशासनाबरोबरच सदाभाऊ बैठका घेत आहेत. या प्रशासनातील बोक्यांवर आता आसूड उगारण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर एकदा आसूड उगारलाच पाहिजे, असे मत बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील यांनी व्यक्त केले.