मुंबई - देशभरात रॅगिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २०२२ ते २०२४ दरम्यान राज्यातील सर्वाधिक ६१ रॅगिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे विद्यापीठ रॅगिंगच्या तक्रारीबाबत देशात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सोसायटी अगेन्स्ट व्हायोलन्स इन एज्युकेशन (सेव्ह) या संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.
स्टेट ऑफ रॅगिंग इन इंडिया २०२२-२४ अहवालानुसार, वैद्यकीय महाविद्यालये रॅगिंगसाठी 'हॉटस्पॉट' ठरत आहेत. रॅगिंगच्या एकूण तक्रारींपैकी ३८.६ टक्के तक्रारी या मेडिकल कॉलेजमधून आल्या आहेत. यातील ३५.४ टक्के तक्रारी गंभीर आहेत. मेडिकल कॉलेजेसमध्ये देशातील केवळ १.१ टक्के विद्यार्थी शिकत असताना तीन वर्षात रॅगिंगसंदर्भातील तब्बल ४५.१ टक्के विद्यार्थ्यांचे मृत्यू हे मेडिकल कॉलेजमधून होत आहेत. इतर महाविद्यालयांच्या तुलनेत ३० पट अधिक रॅगिंग हे मेडिकल कॉलेजमध्ये होत आहे. २०२२-२४ दरम्यान देशभरात ५१विद्यार्थी रॅगिंगमुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी २३ मृत्यू वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये झाले, ही चिंताजनक बाब आहे.कोटामध्ये ५७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.रॅगिंगमुळे देशभरात ५१ आत्महत्या झाल्या.
विद्यार्थ्यांनो घाबरू नका, येथे करा तक्रार : रॅगिंगबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यासाठी १८००-१८०-५५२२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.