हनुमान मंदिरप्रवेशाचा महिलांचा प्रयत्न
By Admin | Updated: January 4, 2016 03:21 IST2016-01-04T03:21:05+5:302016-01-04T03:21:05+5:30
शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला

हनुमान मंदिरप्रवेशाचा महिलांचा प्रयत्न
बीड : शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हनुमान मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला. दोन तास ठिय्या देऊनही पुजाऱ्याने मंदिराचा दरवाजा न उघडल्याने महिलांना माघार घ्यावी लागली.
शहरातील सामाजिक न्यायभवनाच्या पाठीमागे श्री संकल्पसिद्धी हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर ‘महिलांनी आत प्रवेश करू नये,’ अशी सूचना लिहिलेली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे व इतर तीन महिलांनी आक्षेप घेतला. रविवारी सकाळी महिलांनी पुजाऱ्यास फोन करून अभिषेक करावयाचा असल्याचे सांगितले. साड ेनऊच्या सुमारास पुजारी त्या ठिकाणी आला; मात्र त्या वेळी काही महिला व एक पुरुष असल्याचे त्याला दिसले. पुजाऱ्याला श्री संकल्पसिद्धी हनुमान मंदिर मित्रमंडळाच्या तरुणांनी मंदिर न उघडण्याचा सल्ला दिला. या वेळी संतप्त महिलांनी घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान, शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पिंपळे यांनी मंदिराचे पुजारी व इतरांना मंदिराबाहेरील महिलांसाठी लिहिलेली सूचना मिटवून टाकण्याची मागणी केली. मंदिरासमोर गर्दी जमा झाल्यानंतर पुजारी अचानक दिसेनासे झाले. सूचना मिटविण्याचे आश्वासन मंदिर मित्रमंडळाच्या सदस्यांनी दिल्यानंतर तब्बल दोन तासांनी महिला निघून गेल्या. सायंकाळपर्यंत मंदिराच्या बाहेरील ‘महिलांनी आत प्रवेश करू नये’ हे वाक्य मिटविण्यात आले. (प्रतिनिधी)
महिलांवर निर्बंध लादू नयेत
स्त्री-पुरुष समान असे म्हटले जाते; मग महिलांना मंदिरात प्रवेश का दिला जात नाही, आपण आधुनिक महाराष्ट्रात राहात आहोत. जुनी विचारधारा बदलणे आवश्यक आहे. ज्या महिला मंदिरात जाऊन दर्शन घेऊ इच्छितात, त्यांना घेऊ द्यावे. हा विषय त्यांच्यासाठी ऐच्छिक असावा. त्यांच्यावर निर्बंध लादू नयेत, असे अॅड. हेमा पिंपळे यांनी सांगितले.