पत्नी, मुलीच्या खुन्याची फाशी रद्द
By Admin | Updated: February 22, 2015 01:57 IST2015-02-22T01:57:11+5:302015-02-22T01:57:11+5:30
सत्र न्यायालयाने ठोेठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली असून, त्याऐवजी त्यास ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला आहे.

पत्नी, मुलीच्या खुन्याची फाशी रद्द
मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी शिरच्छेद करणाऱ्या नालासोपारा (पू.) येथील चंद्रकांत वसंत आयरे या ३८ वर्षीय नराधमास सत्र न्यायालयाने ठोेठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली असून, त्याऐवजी त्यास ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला आहे.
नालासोपारा येथील हेमंत पाटील चाळीत राहणाऱ्या चंद्रकांतने २८ जून २०११ रोजी पत्नी संचिता आणि मुलगी वैष्णवी यांची शिरे धारधार चाकूने धडावेगळी केल्यानंतर स्वत:वरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चाळीतील इतर लोकांनी दार उघडायला लावेपर्यंत चंद्रकांत या दोघींची रक्तबंबाळ प्रेते चटईवर मांडून ठेवून बाजूला बसून राहिला होता.
अपिलात न्या. विद्यासागर कानडे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देताना त्यास किमान ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला.
न्यायमूर्तींनी म्हटले की, चंद्रकांतने केलेले खून निर्घृण नक्कीच आहेत. पण ज्यासाठी फक्त फाशीच दिली जाऊ शकते, अशा विरळात विरळा या वर्गात ते मोडणारे नाहीत. चंद्रकांतला पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता व तिच्यासह मुलीचाही खून केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून त्याचे मानसिक संतुलन ढळले होते असे दिसते. त्यामुळे हे खून त्याने पूर्व नियोजनाने केले, असेही म्हणता येत नाही. या प्रकरणातील तथ्ये पाहता आरोपीला फाशी देणे न्यायाचे होणार नाही तसेच त्याला निव्वळ जन्मठेप ठोठावूनही न्याय होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)
या खटल्यात पत्नी व मुलीचे खून चंद्रकांत यानेच केले याला कोणताही थेट पुरावा नव्हता की कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र दोन्ही प्रेते व कापलेली मुंडकी चटईवर ठेवून त्यांने घर बंद करून आत बसून राहणे, इतर कोणी घरात घुसून खून केले असतील तर अजिबात आरडाओरड न करणे, घरात त्या वेळी आणखी कोणी नसताना खून कसे झाले याचे स्वत: कोणतेही स्पष्टीकरण न देणे आणि आपल्या स्वत:लाही प्राणघातक जखमा कशा झाल्या, याविषयी मूग गिळून गप्प बसणे या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हे दोन्ही खून चंद्रकांत यानेच केले, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.