‘मृत्यूच्या व्यापाऱ्यांना’ फाशी द्या
By Admin | Updated: September 24, 2015 01:48 IST2015-09-24T01:48:50+5:302015-09-24T01:48:50+5:30
मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,

‘मृत्यूच्या व्यापाऱ्यांना’ फाशी द्या
मुंबई: मुंबईच्या रेल्वे लोकलगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी दोषी ठरवण्यात आलेल्या १२ दहशतवाद्यांपैकी आठ जणांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी बुधवारी सरकारने विशेष मोक्का न्यायालयाकडे केली. विशेष न्यायालयाने शिक्षेवरील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला.
७/११च्या खटल्यातील सर्व आरोपी ‘मृत्यूचे व्यापारी’ आहेत, असा उल्लेख करीत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी १२ आरोपींपैकी आठ आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र असल्याने त्यांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी विशेष न्यायालायाचे न्या. वाय. डी. शिंदे यांच्याकडे केली.
११ जुलै २००६च्या बॉम्बस्फोटा प्रकरणी विशेष न्यायालयाने १२ पैकी ११ आरोपींना दोषी ठरवत एकाची निर्दोष सुटका केली. या बॉम्बस्फोटात १८८ लोक मृत्युमुखी पडले, तर ८०० हून अधिक जखमी झाले होते.
कमल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अहमद अन्सारी, मोहम्मद फैझल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख आलम शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, नावेद हुस्सेन खान आणि असीफ खान या आरोपींनी फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी. तर मोहम्मद माजीद शफीक, मुझम्मील शेख, सोहेल शेख आणि जमीर अहमद शेख यांना आठ जणांपेक्षा वेगळी शिक्षा देण्यात येऊ शकते, असे म्हणणे अॅड. ठाकरे यांनी न्या. शिंदे यांच्यासमोर मांडले. या चारही जणांना दया दाखवण्याचा विचार न्यायालय करीत असेल तर त्यांनी केलेला गुन्हा पाहता, त्यांना अनेक वेळा जन्मठेप होऊ शकेल.
त्यामुळे या चारही जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठवावी किंवा त्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ठोठवावी, अशी मागणी अॅड. ठाकरे यांनी विशेष न्यायालयाकडे केली.
ज्या वेळेत बॉम्बस्फोट करण्यात आला त्या वेळी चर्चगेट ते विरार यादरम्यान लोकलमध्ये गर्दी असते, हे सगळ्यांना माहीत आहे. हे बॉम्बस्फोट जाणूनबुजून संध्याकाळी आणि गर्दीच्या वेळी करण्यात आले. कारण याच वेळी अनेक लोकांचा जीव जाईल याची संपूर्ण कल्पना आरोपींना होती. आरोपींच्या या योजनेवरूनच त्यांची मानसिकता स्पष्ट होते, असाही युक्तिवाद अॅड. ठाकरे यांनी केला.