जानकरांचा हातात हात तर पवारांची गळाभेट
By Admin | Updated: January 13, 2016 01:35 IST2016-01-12T21:20:41+5:302016-01-13T01:35:29+5:30
बदलती समीकरणे : पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शिवसेनेकडे रासपचे एक पाऊल; भाजपच्या हालचालींना माजी पालकमंत्र्यांकडून सबुरीचा सल्ला

जानकरांचा हातात हात तर पवारांची गळाभेट
सातारा : जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची समीकरणे आता वेगाने घडू पाहत आहेत. भाजपच्या बेदिलीमुळे घायाळ झालेले आमदार महादेव जानकर शिवसेनेशी जवळीक करण्याच्या विचारात आहेत. तर भाजपचे दीपक पवार कुठलेही प्रकरण राष्ट्रवादीने शेकवण्यासाठी भाजप-सेनेची मोट बांधू पाहत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याचे चित्र स्पष्टपणे दिसले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही ते याआधी उपस्थित राहिलेले नव्हते. सोमवारच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली; पण संपूर्ण सभेच्या कामकाजाच्यावेळेत त्यांनी मुद्दा मांडला नाही. जानकरांच्या या मौनात बरीच अस्वस्थता सामावली होती, हे सांगायचीही गरज नव्हती. बैठक संपल्यानंतर मात्र आ. जानकरांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांची भेट घेऊन त्यांच्या हातात हात देत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तुटून पडण्याची संधी शोधणाऱ्या भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आ. जयकुमार गोरे यांनी मांडलेल्या बंधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर माजी पालकमंत्री व जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता. सध्याच्या पालकमंत्र्यांवर हे प्रकरण बेतता कामा नये, असे सावध पण सूचक वक्तव्यही त्यांनी केले. सभा संपल्यानंतर आ. शिंदे यांनी दीपक पवारांना जवळ घेत त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेच्या अंती या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात गळेही घातले. (प्रतिनिधी)
माण-खटावकडे द्या लक्ष....
माण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी ताकद क्षीण झाली आहे. या परिस्थितीत काँगे्रस आणि रासप या दोन पक्षांची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे. रासपचे आमदार महादेव जानकर यांनी आता भाजपशी पंगा घेतला असल्याने त्यांना सोबत घेण्यासाठी पालकमंत्री शिवतारे प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत.
कोरेगावात असलो तरी जावळीवर नजर
माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांना जावळी मतदारसंघातून कोरेगावकडे पुनर्वसित व्हावे लागले होते. तरीही जावळी तालुक्यावर त्यांनी आपली पकड कायम ठेवली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केलेला पराभव विसरला काय?, असंच जणू शिंदे यांनी दीपक पवारांना सांगितले.