टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मनमानीला लगाम
By Admin | Updated: May 21, 2016 01:59 IST2016-05-21T01:59:45+5:302016-05-21T01:59:45+5:30
एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून रिक्षा-टॅक्सीचालकाला विचारणा होताच काही चालकांकडून भाडे नाकारले जाते

टॅक्सी-रिक्षाचालकांच्या मनमानीला लगाम
मुंबई : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून रिक्षा-टॅक्सीचालकाला विचारणा होताच काही चालकांकडून भाडे नाकारले जाते आणि मनमानी कारभाराचे दर्शन घडविले जाते. या मनमानी कारभाला मुंबई वाहतूक पोलिसांकडून लगाम लावण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत भाडे नाकारण्याच्या ३,८0९ केसेस वाहतूक पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.
भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने भाडे आकारणी यासारख्या तक्रारी प्राप्त होताच मुंबई वाहतूक पोलिसांकडून रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. टॅक्सीचालकांविरोधात मुंबई शहरातील चर्चगेट आणि सीएसटी परिसर, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन, लोअर परेल, दादर, सायन, भायखळा तर रिक्षाचालकांविरोधात वांद्रे, खार, अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, मालाड, बोरीवली, सायन भागातून सर्वाधिक तक्रारी येत आहेत. यात मनमानी पद्धतीने भाडे आकारण्यापेक्षा भाडे नाकारण्याच्या तक्रारी अधिक असल्याचे वाहतूक पोलिसांतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
मात्र त्याला लगाम लावण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. जानेवारी महिन्यात भाडे नाकारण्याच्या रिक्षाचालकांविरोधात ३८७ केसेस तर टॅक्सीचालकांविरोधात १९७ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्यात प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाईही केली आहे. एप्रिलमध्ये रिक्षाचालकांविरोधात १ हजार ५९१ तर टॅक्सीचालकांविरोधात ५६१ केसेस दाखल झाल्या आहेत. मागील
चार महिन्यांत एकूण ३ हजार
८0९ केसेसची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
भाडे नाकारण्याच्या तक्रारी दाखल होताच त्यांच्यावर २00 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र कोर्टात प्रकरण जाताच जादा दंड आकारणीही होत असल्याची माहिती देण्यात आली.