मलंग रस्त्यावरील १२३ बांधकामांवर हातोडा
By Admin | Updated: March 1, 2017 03:54 IST2017-03-01T03:54:45+5:302017-03-01T03:54:45+5:30
केडीएमसीने मंगळवारी पूर्वेतील मलंग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली
_ns.jpg)
मलंग रस्त्यावरील १२३ बांधकामांवर हातोडा
कल्याण : केडीएमसीने मंगळवारी पूर्वेतील मलंग रस्त्यावर रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली. चक्कीनाका ते नेवाळी नाका दरम्यान केलेल्या कारवाईत १२३ बांधकामे तोडली. या कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. त्यामुळे कारवाई अर्धवट सोडत महापालिकेची पथके माघारी परतली. एका स्थानिक नेत्याची बांधकामे वाचवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांनी चक्की नाका ते नेवाळी नाका या ३० मीटर लांब रस्त्याच्या रु ंदीकरणाची मोहीम मंगळवारी हाती घेतली. या कारवाईसाठी आयुक्तांनी प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड व प्रकाश ढोले यांच्याकडे आशीष हॉटेल ते व्दारली पाडापर्यंत तर अमित पंडित आणि प्रभाकर पवार यांच्याकडे व्दारली पाडा ते नेवाळी नाक्यापर्यंत दोन्ही बाजूकडील बांधकामे तोडण्याची जबाबदारी दिली होती.
दरम्यान, चक्कीनाका पर्यंतचा रस्ता ८० फुटी केला असताना आता १०० फुटीचा अट्टाहास का? असा सवाल स्थानिकांनी केला होता. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या कारवाईला प्रारंभी किरकोळ विरोध झाला. परंतु, एकीकडे घरांवर कारवाई होत असताना दुसरीकडे एका स्थानिक नेत्याची बांधकामे वाचवण्याचा महापालिकेचा सुरू असलेला खटाटोप पाहता रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या विरोधामुळे कारवाई थांबवावी लागली. कारवाईच्या वेळी तो नेता घटनास्थळी ठाण मांडून होता, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>दुमजली इमारतही पाडली
या कारवाईत दुकानांचे गाळे, खोल्या, गॅरेज, लहान हॉटेल्स, आणि दुमजली इमारती पाडण्यात आल्या. त्यासाठी पाच जेसीबी आणि दोन पोकलेनची मदत घेण्यात आली. या कारवाई दरम्यान महापालिकेचे १५ आणि उल्हासनगर पोलीस ठाण्याचे २०, असे ३५ पोलीस तर महापालिकेचे ५५ कर्मचारी तैनात होते.