हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई
By Admin | Updated: May 29, 2015 00:02 IST2015-05-28T23:11:17+5:302015-05-29T00:02:19+5:30
मुख्यमंत्री : मार्गताम्हाणेतील कार्यक्रमात ग्वाही ; कोकणच्या पर्यटन विकासासाठी पाच वर्षांचा आराखडा

हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई
गुहागर : अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानभरपाई नेमकी कशी द्यावी, याचा अहवाल देण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. येत्या पंधरा दिवसांत या भरपाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील पद्मावती देवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वसंतराव भागवत, डॉ. तात्या नातू यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले हे भाग्यच असल्याचे सांगताना संस्काराच्या भक्कम पायावरच मुख्यमंत्री होता आल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.सर्व प्रकारांची शिल्पे एकत्र करून हे मंदिर बांधले गेले आहे. भारताचा एकसंधपणा यातून दिसतो. हे मंदिर समाज परिवर्तनाचे केंद्र झाले पाहिजे, असे ते म्हणाले. कोकणात भरपूर पाऊस पडूनही शेतीसाठी, फलोत्पादनासाठी उपयोग होत नाही. पावसाचे सर्व पाणी समुद्राला मिळते. त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची चळवळ उभारण्याचे काम जोमाने सुरूआहे. महाराष्ट्रात ६ हजार गावात ७० हजार कामे जलयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून ४२ कोटी रुपयांची कामे केली. खटाव व माणसारख्या दुष्काळी गावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे की, पुढील काळात तेथे टँकर द्यावा लागणार नाही.
महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडूनही काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करून गावागावांत पाण्याचे विकेंद्रित साठे निर्माण करून त्या माध्यमातून गावाची उत्पन्न क्षमता कशी वाढेल, यावर भर देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
पर्यटन हे कोकणचे बलस्थान आहे. पाच वर्षे योग्य प्रकारे नियोजन केले तर गोव्यापेक्षा जास्त पर्यटक कोकणामध्ये दिसू शकतात एवढी कोकणाची क्षमता आहे. यासाठी जिल्ह्याचा पर्यटन आराखडा करण्याचे काम सुुरू आहे.
सिंधुदुर्गमधील सी-वर्ल्डचा प्रश्न सोडविण्यात आला. या प्रकल्पासाठी ८०० एकर एवढी अनावश्यक जागा कमी करून दोनशे एकर केल्यानंतर लोकांनी चांगले सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
या मंदिरामध्ये पुढील काळात संस्कार केंद्र चालविली जाणार असून, मार्गताम्हाणे गावाच्या विकासासाठी हे गाव दत्तक घेतल्याचे भाजप प्रवक्ते मधू चव्हाण यांनी जाहीर केले. यावेळी आमदार भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार योजनेला मागणी
जलयुक्त शिवार योजनेत आम्हालाही सहभागी करा, अशी गावागावांतून मागणी होत आहे. जलयुक्त शिवार योजना येथे संपत नाही.
पाण्याचे नीट नियोजन केल्यानंतर शेती विकास व मार्केटिंगपर्यंत संपूर्ण साखळी तयार करण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावर्षी आंब्यावर मोठे संकट आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा झाली आहे. कशा प्रकारे मदत करायची याचा अहवाल देण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. त्यावर पुढील दोन मंत्रिमंडळांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.