सहा महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: May 29, 2015 01:22 IST2015-05-29T01:22:17+5:302015-05-29T01:22:17+5:30
गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत.

सहा महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई : गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत. शिवाय, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचे १८२७.६२ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, गारपीट आणि वादळाने झालेल्या नुकसानीची मदत तर अजून कागदावरच आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
खरीपाच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ३० मे ते १ जून असे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही मुंडे यांनी दिली. मुंडे म्हणाले, सरकारकडे ४८०३.०९ कोटींची मागणी २६ जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. प्रत्यक्षात फक्त ३४३५.७३ कोटींची मदत दिली गेली. उर्वरित १८७२.६२ कोटी दिलेले नाहीत. एकीकडे जन धन योजनेत प्रत्येकाचे बँक खाते आहे असा डांगोरा पिटणाऱ्या युती सरकारने शेतकऱ्यांची खाती सापडत नाहीत म्हणून ४६० कोटी रुपये दिलेले नाहीत, असेही मुंडे म्हणाले.
१५०४ आत्महत्यांपैकी अमरावती विभागात ५८५, मराठवाड्यात ५३२, नाशिक विभागात १९९, नागपूर विभागात १६२, तर कोकणात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीही सांगितली. आत्महत्येनंतर ४८ तासात जिल्हास्तरीय समितीसमोर प्रकरण ठेवून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची कारवाई करण्याच्या सूचना असताना अद्यात २९९ आत्महत्यांचा अहवालच आलेला नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
च्दुष्काळी परिस्थिती तीव्र असताना राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून विमा कंपनीला २५० कोटी रुपये प्रिमीयम भरला मात्र सरकारने स्वत:च्या हिश्श्याचे ६३० कोटी रुपयांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नव्हती.
च्काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आकस्मिकता निधीतून ही रक्कम देण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.