शेतमालाची आवक निम्म्यावर
By Admin | Updated: April 10, 2015 23:49 IST2015-04-10T23:49:26+5:302015-04-10T23:49:26+5:30
अकोला बाजार समितीत धान्याची आवक मंदावली.

शेतमालाची आवक निम्म्यावर
विवेक चांदूरकर/अकोला : ऐन हंगामात पावसाची दांडी, त्यानंतर चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस, यामुळे यावर्षी खरीप व रब्बी हंगामात पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, तुरीसह अन्य पिकांच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्याचे बाजार समितीतील शेतमालाच्या खरेदीवरून लक्षात येते. अकोला बाजार समितीत गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत १४ लाख २४ हजार ८00 क्विंटल धान्याची आवक झाली होती, यावर्षी केवळ ९ लाख ७६ हजार ६१३ क्विंटल धान्याची आवक झाली आहे. २0१४-१५ च्या खरीप हंगामाच्या वेळी पावसाळ्यात पावसाने दांडी दिली. पाऊस तब्बल दोन महिने उशिरा आला, त्यानंतर रब्बी पिकाच्या वेळी चार ते पाच वेळा अवकाळी पाऊस आला. त्यामुळे यावर्षी शेतमाल उत्पादनात प्रचंड घट आली आहे. मूग व उडिदाच्या पेरणीच्या वेळी पाऊस आला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणीच करण्यात आली नाही. सोयाबीन, तुरीसह अन्य पिकांच्या उत्पादनातही ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आली आहे. शेतकरी त्यांचा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला आणतात. यावर्षी अकोला बाजार समितीत गतवषीच्या तुलनेत निम्म्या शेतमालाची विक्री करण्यात आली. बाजार समितीत गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत ७ लाख ३५ हजार ९७१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षी मात्र ४ लाख ५६६ क्विंटल आवक झाली. सोयाबीनचा हंगाम संपला असून, यावर्षी ३ लाख ३५ हजार ५६६ क्विंटल आवक कमी झाली आहे. सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. जिल्ह्यातील ७0 टक्के शेतकरी सोयाबीनची पेरणी करतात. त्यामुळे सोयाबीनच्या बाजार समितीतील खरेदीवरून उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे लक्षात येते. हरभर्याची खरेदी गतवर्षी ५ एप्रिलपर्यंत ३ लाख २५ हजार ८४२ क्विंटल करण्यात आली होती. यावर्षी मात्र २ लाख ७३ हजार ४४१ क्विंटल करण्यात आली आहे. हरभर्याची आवक ५२ हजार क्विंटलने कमी झाली आहे. *अवकाळी पावसाचा काही पिकांना फायदा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काही पिकांना फायदा झाला आहे. गतवर्षी ९ एप्रिलपर्यंत गव्हाची ३२ हजार ८८९ क्विंटल आवक झाली होती, यावर्षी ४५ हजार ३५५ क्विंटल आवक झाली आहे. मका पिकाची गतवर्षी ८१४ क्विंटल आवक झाली, तर यावर्षी ११५६ क्विंटल आवक झाली.