गुटख्यावर पुन्हा बंदी

By Admin | Updated: July 20, 2014 01:13 IST2014-07-20T01:13:24+5:302014-07-20T01:13:24+5:30

गुटखा आणि पानमसाल्यावर घातलेली बंदी राज्य सरकारने आणखी एक वर्षाने वाढवली आहे. गुटखा बंदीत वर्षभराची वाढ केल्याची माहिती अन्न प्रशासनाचे नागपूर विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी

Gutka ban again | गुटख्यावर पुन्हा बंदी

गुटख्यावर पुन्हा बंदी

एक वर्षाने वाढ : विभागात ६ हजार तपासण्या
नागपूर : गुटखा आणि पानमसाल्यावर घातलेली बंदी राज्य सरकारने आणखी एक वर्षाने वाढवली आहे. गुटखा बंदीत वर्षभराची वाढ केल्याची माहिती अन्न प्रशासनाचे नागपूर विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. गुटख्यामुळे तोंडातील कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता बंदी वाढविली आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली होती. बंदीचा कालावधी १८ जुलैला संपला असून त्याआधीच १५ जुलैला राज्य शासनाने अध्यादेश काढला आहे. राज्य सरकारने १८ जुलै २०१२ मध्ये गुटख्याचा साठा, वितरण आणि विक्रीवर बंदी घातली होती. त्यानंतर एक वर्षाने वाढविली. आता यावर्षी पुन्हा निर्णय घेत बंदी एक वर्षाने वाढविण्यात आल्याचे देसाई म्हणाले.
नागपूर विभागात
६ हजार तपासण्या
गुटख्यावरील बंदीनंतर नागपूर विभागाने दोन वर्षात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यामध्ये ५९७३ तपासण्या केल्या. एकूण १६२ प्रकरणांमध्ये जप्ती केली तर ६६ प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदविला. कारवाईत २ कोटी १२ लाख ५१ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. ५२ प्रकरणे खटले दाखल करण्यासाठी प्रलंबित आहेत. २० जुलै २०१३ ते १८ जुलै २०१४ या कालावधीत नागपूर विभागात २२७१ पेढ्यांची तपासणी करून ३९ प्रकरणांमध्ये १ कोटी ४१ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त केला. त्याआधीच्या वर्षात नागपूर विभागात २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ या दरम्यान ३६८५ पेढ्यांची तपासणी करून ७० लाख ७५ हजार रुपयांचा गुटखा जप्त केल्याचे देसाई यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांच्या अधिसूचनेनुसार गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट किंवा सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट किंवा सुगंधित सुपारी, खर्रा या स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही नावाने संबोधली जाणारी किंवा ग्राहकाला मिश्रण करण्यास सहजरीत्या सुलभ होईल, अशा रीतीने तयार केलेल्या उत्पादनाची निर्मिती, साठवण, वितरण किंवा विक्रीस बंदी आहे. आतापर्यंत देशात २६ राज्यांनी गुटखा खरेदी-विक्रीवर बंदी घातली आहे.पाच केंद्रशासित प्रदेशांमध्येही गुटखा विक्रीवर बंदी आहे. पत्रपरिषदेत अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त एन.आर. वाकोडे आणि अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gutka ban again