गुरुरूपी नैसर्गिक शक्तीचे पूजन
By Admin | Updated: July 20, 2016 00:55 IST2016-07-20T00:55:32+5:302016-07-20T00:55:32+5:30
सारथी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त निसर्गातील गुरूंची महती व्यक्त करून निसर्गरूपी गुरूंचे पूजन या वेळी करण्यात आले.

गुरुरूपी नैसर्गिक शक्तीचे पूजन
पुणे : सारथी विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त निसर्गातील गुरूंची महती व्यक्त करून निसर्गरूपी गुरूंचे पूजन या वेळी करण्यात आले.
शाळेत आपापल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत असते. घरात आपल्याला आईवडिलांकडून ज्ञान मिळते; परंतु निसर्गात आपल्याला प्राणी, पशू, पक्षी, सूर्य, पृथ्वी, पाणी, फुले, लहान बाळ, आकाश यांच्याकडूनही आपण अनेक गोष्टी शिकत असतो. स्वत: तळपत राहून दुसऱ्यांच्या जीवनात सदैव प्रकाश देण्याचे काम सूर्य करतो. मुंगीपासून चिकाटी, जिद्द, शिस्त याचे धडे आपण घेतो.
दुसऱ्यांच्या जीवनात सुगंध देऊन आपले जीवन सार्थ ठरविण्याचे कार्य फूल करते. तर आपल्या प्रत्येक अवयवाचा उपयोग हा दुसऱ्याचे जीवन उज्ज्वल करण्याचे काम झाडे, वेली सदैव करत असतात. प्रामाणिकपणा, इमानदारी राखण्याचे काम कुत्र्याकडून शिकायला मिळते.
निसर्गातील या गुरूपासून आपण आपल्या निरीक्षणातून, अनुभवातून बरंच काही शिकतो. अशा या गुरूंची महती इ. पहिली ते दहावीच्या शिक्षकांनी बिनभिंतीची शाळा, सुगंधी सृष्टी, माणसांनी छळले नदीला यांसारख्या पाठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यक्रमप्रसंगी इ. १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू देऊन गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश जगताप, सचिव प्रकाश साळुंके, चंदननगर विभागाचे पोलीस नाईक शिंगाडे, संजय राजे, पोलीस कॉन्स्टेबल गिरे व घोडके, मुख्याध्यापिका मधुरा चौधरी व शुभांगी माने इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संगीता जाधव यांनी केले. गुरूविषयीची माहिती वैशाली गव्हाणे यांनी सांगितली.
>वाघोलीत गुरुपौर्णिमा
वाघोली : वाघोली-वडजाई येथील दत्तमंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी दिवसभर भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरामधे व गाभाऱ्यामधे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. दुपारी श्री महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.