गुरू म्हणजे आर्ट आॅफ लाईफ
By Admin | Updated: July 20, 2016 00:54 IST2016-07-20T00:54:05+5:302016-07-20T00:54:05+5:30
गुरू नेहमी आपल्याला प्रेरणा देतात. गुरू कुंभाराप्रमाणे असतात. ते आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात.

गुरू म्हणजे आर्ट आॅफ लाईफ
बिबवेवाडी : गुरू नेहमी आपल्याला प्रेरणा देतात. गुरू कुंभाराप्रमाणे असतात. ते आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम करतात. त्यांच्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. गुरू म्हणजेच जीवनाचे शिल्पकार आणि आर्ट आॅफ लाईफ आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रसंत चंद्रप्रभसागर महाराज यांनी व्यक्त केले.
जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्टच्या वतीने चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच मध्ये ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत ललितप्रभसागर उपस्थित होते.
या वेळी प.पू. चंद्रप्रभ महाराज यांनी सांगितले, की प्रत्येकाच्या जीवनात कोणी ना कोणी गुरू असतो. गुरूशिवाय जीवन जगणे अशक्य आहे. गुरूची आपण सेवा केली पाहिजे. गुरू हे कुंभाराप्रमाणे असतात एक बाजूने प्रेम करतात.
परंतु, दुसऱ्या बाजूने शिस्त आणि संस्कारी बनविण्यासाठी तितकेच कठोर ही बनतात. गुरू अनेक शिष्य तयार करतात. मुलांचे लाड केले तर ते बिघडू शकतात. मुलांचे निर्माण फक्त प्रेमाने होत नाही, तर वेळप्रसंगी आई-वडिलांनी गुरूचीपण भूमिका निभावली पाहिजे.
कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष भंवरलाल जैन, चातुर्मास समिती अध्यक्ष अशोक घीवाला, फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, चंदुभाई शहा, तेजपाल गोटीवाला, मोहनलाल हंसाजी, अचल जैन, बाळासाहेब कटारिया, शरद शहा, भरत सुराणा, विमल संघवी, प्रवीण जैन, सतीश शहा, ललित गुंदेशा, अशोक हिंगड, यांच्यासह दादावाडी टेंपल ट्रस्टचे, चातुर्मास समितीचे सर्व पदाधिकारी, अनेक जैन मंडळे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
>प. पू. चंद्रप्रभसागर महाराजांनी सांगितले, की गुरू जीवनाचा रक्षणकर्ता असतो. संस्कारित मुले घडविण्यासाठी त्यांना गुरूचा सहवास मिळणे गरजेचे आहे. गुरू अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणतात. शिष्य हा दगडासारखा असतो. गुरू त्याला शिक्षा, संस्कार, ज्ञान देऊन सभ्य आणि शालीन बनवतात. गुरू प्रत्येकाला जीवन कसे जगले पाहिजे, याची कला शिकवतात. समाज, परिवार आणि संसारामध्ये कशा प्रकारे वागले पाहिजे, याचे ज्ञान गुरू देतात. गुरूमुळे जीवनातील अंधार दूर होतो आणि आपले जीवन समृद्ध बनते.