कदम-मुनगंटीवारमध्ये व्याघ्रदूतासमोर ‘गुरगुर’!
By Admin | Updated: October 8, 2015 03:36 IST2015-10-08T03:36:49+5:302015-10-08T03:36:49+5:30
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील ‘गुरगुर’पाहून वन विभागाचे व्याघ्रदूत बिग बी अमिताभ बच्चन यांची पुरेपूर करमणूक झाली.

कदम-मुनगंटीवारमध्ये व्याघ्रदूतासमोर ‘गुरगुर’!
मुंबई : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यातील ‘गुरगुर’पाहून वन विभागाचे व्याघ्रदूत बिग बी अमिताभ बच्चन यांची पुरेपूर करमणूक झाली.
अमिताभ बच्चन यांनी वन विभागाचे व्याघ्रदूत व्हावे याकरिता त्यांना विनंती करायला मुनगंटीवार एकटेच गेले. मंगळवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानात अमिताभ बच्चन आणि सुधीर मुनगंटीवार या दोघांनीच व्याघ्र सफारी केली.
सायंकाळच्या कार्यक्रमाकरिता कदम अर्धा तास आधी पोहोचले तेव्हा ते एकटेच बसून होते. व्याघ्र सफारी संपवून मुनगंटीवार व बच्चन परतल्यावर कार्यक्रम सुरु झाला. त्यामुळे कदम यांचा हिरमोड झाला.
या प्रकारामुळे कदम यांना आपली नाराजी लपविता आली नाही. ते म्हणाले, पर्यावरण खाते माझ्याकडे तर वन खाते मुनगंटीवारांकडे आहे. आता ही भाजपाची मंडळी जे देतील ते आम्ही घ्यायचे आहे! हा नॅशनल पार्कचा परिसर माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. गेली ४५ वर्षे मी येथे राहिलो आहे. वाघ तर मी नेहमीच पाहतो. वाघासमोर वाघ पळून जात नसतो. वाघांवर अन्याय होणार नाही याची दक्षता सुधीरभाऊ तुम्ही घ्यायला हवी. कधी कधी पर्यावरणाची कामं आली तर मलाही सोबत घ्या, असा चिमटाही त्यांनी काढला.
त्यावर मुनगंटीवार यांनी खास वैदर्भीय शैली उत्तर दिले. ते म्हणाले, रामदासभाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्या आणि माझ्या खात्याचे भावासारखे नाते आहे. परंतु पर्यावरण बिघडले की माणसाची चिडचिड होते.... पती-पत्नीतही भांडणे होतात. त्यामुळे पर्यावरण चांगले राखणे ही आपली जबाबदारी आहे! (विशेष प्रतिनिधी)
कदमांचे दुखणे
वन आणि पर्यावरण ही जुळी खाती सध्या अनुक्रमे भाजपा व शिवसेनेकडे आहेत. अमिताभ बच्चन यांनी वन विभागाचे व्याघ्रदूत व्हावे याकरिता त्यांना विनंती करायला मुनगंटीवार एकटेच गेले. आपणास सोबत नेले नाही, ही बाब पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना खुपली आहे.