पिंपरी : शहराच्या विविध भागांत वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. निगडी, भोसरी, पिंपरी, नेहरुनगर, थेरगाव, एवढेच नव्हे तर उच्चभ्रू वस्ती मानला गेलेला प्राधिकरणाचा भाग या ठिकाणीसुद्धा रस्त्यावर लावलेल्या मोटारींची तोडफोड केल्याच्या घटना घडल्या. बुधवारी चिखली, मोरेवस्तीत घडलेल्या वाहनांची तोडफोड झाली. लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे त्रिवेणीनगरमध्ये दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. वारंवार घडू लागलेल्या या घटनांनी शहरातील कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे प्रत्ययास आले. किरकोळ कारणावरून थेरगाव डांगे चौकात वाहनांची तोडफोड केल्याची घटना चार महिन्यांपूर्वी घडली. तेव्हापासून वेगवेगळ्या भागात अशा घटना घडू लागल्या आहेत. वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याचे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून, पोलिसांकडून हे सत्र रोखण्याची ठोस कामगिरी होऊ शकली नाही. तोडफोड करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल केले. कारवाई केली. फरार आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सांगून पोलीस मोकळे होतात. तोडफोड सत्र मात्र थांबत नाही. तोडफोड करणाऱ्यांवर एकीकडे गुन्हे दाखल होतात. तर दुसरीकडे ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, ज्यांनी सामाजिक स्वास्थ्यास बाधा आणली, अशांवर तडीपारीची कारवाई केली असताना, ते याच परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. बहुतांशी घटनांमध्ये तडीपार केलेल्या गुंडांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे. तडीपार गुंड तडीपारीच्या आदेशाचा भंग करून याच परिसरात राजरोसपणे वावरण्याचे धाडस कसे दाखवतात? हा मुद्दा उपस्थित झाला आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्यांची धिंड काढण्याचे कठोर पाऊल पोलिसांनी उचलले, तरच त्यांच्यावर वचक बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये रस्त्यात उभी असलेली दुचाकी पेटविण्याचा प्रकार घडला. ही दुचाकी जळून खाक झाली. शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून काळेवाडीत अल्पवयीन मुलांनी रात्री बाराच्या सुमारास एका चारचाकी मोटारीची तोडफोड केली. बौद्धनगर, भाटनगरमध्ये दोन गटांत झालेल्या वर्चस्ववादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. (प्रतिनिधी)>तडीपार गुंडांचा तोडफोडीत सहभागआनंदनगरमध्ये तडीपार गुंड व त्याच्या साथीदारांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हत्यारे घेऊन वावरणाऱ्या गुंडांच्या टोळक्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. अशा घटना वारंवार घडू लागल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उडू लागला आहे. दहशतवाद, गुंडगिरी पोलिसांच्या हाताबाहेर गेली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यातून एक ते दोन वर्षांसाठी तडीपार केलेले अनेक गुन्हेगार शहरातच वावरत असल्याचे आढळून आले आहे. तडीपारी आदेशाला न जुमानता ते शहरातील नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचे काम करीत आहेत. त्यांना रोखण्याचे धाडस मात्र पोलिसांकडून होत नाही.
गुंडगिरी पोलिसांच्या हाताबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 01:20 IST