कर्जमाफीऐवजी फक्त आश्वासनांची‘गाजरे’! राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
By Admin | Updated: March 18, 2017 19:59 IST2017-03-18T19:59:15+5:302017-03-18T19:59:15+5:30
कर्जमाफीऐवजी केवळ आश्वासनांची ‘गाजरे’मिळाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे

कर्जमाफीऐवजी फक्त आश्वासनांची‘गाजरे’! राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची‘पारदर्शक’ फसवणूक झाली असून, कर्जमाफीऐवजी केवळ आश्वासनांची ‘गाजरे’मिळाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
'अर्थसंकल्पानंतर विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले तर विश्वासघात मिळाला, फसवणूक मिळाली, प्रतारणा मिळाली, अपेक्षाभंग मिळाला, यु-टर्न मिळाला, वचनभंग मिळाला आणि आश्वासनांची गाजरे मिळाली. सभागृहात शेतकरी कर्जमाफीसाठी टाळांचा गजर सुरू होता. परंतु, अर्थमंत्र्यांनी बळीराजाच्या स्वप्नाला हरताळ फासल्याचे', विखे पाटील बोलले आहेत.
'अर्थसंकल्पाचे इतके राजकीय भाषण मागील अनेक वर्षांत ऐकण्यात आलेले नाही. सत्ताधाऱ्यांना ‘मन की बात’ची इतकी सवय झाली आहे की, आता कोणतेही भाषण ते निवडणुकीतील भाषणाच्या शैलीतच ठोकतात', असा टोला विखे पाटील यांनी लगावला. 'अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात ‘नमामि चंद्रभागा’चा संदर्भ वापरला होता. त्याचा समाचार घेताना विरोधी पक्षनेत्यांनी ‘बळीराजा म्हणतो आधी बुडवा यांना, आणि मग म्हणा नमामि चंद्रभागा’, या शब्दात अर्थमंत्र्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
'2016-17 च्या अर्थसंकल्पात हे वर्ष 'शेतकरी स्वाभिमान वर्ष' म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र 2016 मध्ये 3 हजारांहून अधिक तर 2017 च्या पहिल्या 2 महिन्यात सुमारे 400 शेतकरी आत्महत्या झाल्या. या सरकारने शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी काहीही दिले नाही. कर्जमाफी देण्याचे आपलेच आश्वासन देखील ते पाळू शकले नाहीत', याचे स्मरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दिले.
'सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या असत्या तर आज अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर झाली असती. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी थातूरमातूर योजना जाहीर केल्या व त्याचे उदात्तीकरण करताना “लाभेल माझ्या बळीराजाला सन्मानाचा घास” अशा वल्गना केल्या. मात्र प्रत्यक्षात या सरकारने शेतकऱ्यांना सन्मानाचा घास तर दिलाच नाही. पण् शेतकऱ्यांचे जगणेही हिरावून घेतले', अशा कठोर शब्दांत विखे पाटील यांनी कर्जमाफीबद्दल सरकारच्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला.