पालकमंत्र्यांच्या कारची धडक; दुचाकीस्वार गंभीर

By Admin | Updated: March 30, 2015 00:23 IST2015-03-29T22:22:35+5:302015-03-30T00:23:23+5:30

कुडाळात जोरदार चर्चा : केसरकरांकडून चौकशीही नाही

Guardian's car hits; Bicycling serious | पालकमंत्र्यांच्या कारची धडक; दुचाकीस्वार गंभीर

पालकमंत्र्यांच्या कारची धडक; दुचाकीस्वार गंभीर

कुडाळ : पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय कारने कर्ली येथील मच्छिंद्रनाथ तुळसकर या मोटारसायकलस्वाराला बिबवणे येथे जोरदार धडक देत उडविले. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा पाय निकामी होऊन गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारांसाठी गोवा येथे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अपघातातील जखमी व चालक यांची साधी चौकशीही केली नसल्याची घटनास्थळी जोरदार चर्चा होती. पालकमंत्री दीपक केसरकर यांना आणण्यासाठी ओरोसहून शासकीय गाडी घेऊन फिलिप्स डुमिंग सोज हा रविवारी सकाळी ८ वाजता सावंतवाडी येथे जात होता. गाडी कुडाळ तालुक्यातील बिबवणे-तेर्सेबांबर्डे येथील हॉटेल गुरुप्रसाद समोरील मुंबई-गोवा महामार्गावर आली असता भरधाव वेगाने जाणाऱ्या या गाडीने सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटारसायकलस्वार व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट लांब असलेल्या झाडीत जाऊन पडली. यामध्ये मोटारसायकलस्वार मच्छिंद्रनाथ तुळसकर हे गंभीर जखमी झाले. कारची धडक त्यांच्या पायावर बसल्याने त्यांचा पायही निकामी होण्याची शक्यता आहे. त्यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारांसाठी गोवा येथे हलविण्यात आले. अपघाताबाबत कारचालक सोज याने तक्रार दिली असून रस्त्याकडेच्या कलिंगडच्या दुकानाकडून डाव्या बाजूला मोटार सायकल वळविताना हा अपघात झाल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान, या अपघाताची माहिती पालकमंत्र्यांना मिळाली. परंतु अपघातग्रस्त मोटारसायकलस्वार व कारचालक यांची चौकशी न केल्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, अपघातस्थळी कुडाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, पोलीस उपनिरीक्षक सतीश निकम, सचिन पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian's car hits; Bicycling serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.