पालकमंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार : तावडे
By Admin | Updated: December 2, 2014 00:24 IST2014-12-01T22:31:22+5:302014-12-02T00:24:40+5:30
४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असेल.

पालकमंत्री जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार : तावडे
कणकवली : ४ डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होईल. त्यामध्ये आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असेल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग दौऱ्यात त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. पुढील कार्यक्रमाचे निमित्त सांगत अवघ्या १३ मिनिटांत आढावा बैठक आटोपली.
मंत्रीपद मिळाल्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांचा हा पहिलाच सिंधुदुर्ग दौरा होता. संस्था प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर तावडे यांनी दुपारी जिल्ह्यातील खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यातील अशासकीय समिती पदांवरील नेमणुका रद्द करण्याचे आदेश तावडे यांनी दिले. कुठल्याही पक्षाचे समिती सदस्य असले तरी सर्व समित्यांच्या अशासकीय पदांवर फेर नेमणुका केल्या जातील, असे ते म्हणाले. रायगड जिल्ह्यातील रिक्त पदांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकडून अद्याप रिक्त पदांचा अहवाल राज्याकडे मिळालेला नाही, तो तातडीने पाठवून द्यावा, असे आदेश तावडे यांनी दिले. तंत्रशिक्षण संस्थामधील रिक्त पदांचा अहवालही तातडीने द्या, असे तावडे म्हणाले. जिल्ह्याच्या विकास आराखड्यासंदर्भात तावडे यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्याचा ७३ कोटी, १०० कोटी आणि १२० कोटी असा तीन प्रकारे आराखडा तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तारामुंबरी पूल, आनंदवाडी पूल रखडल्याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
जनहिताच्या कामांना प्राधान्य द्या
नारायण राणे यांच्यावर रोख ठेवत तावडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या कमिटमेंटचा विचार करू नका. जिल्ह्याच्या ठराविक भागाला प्राधान्य न देता. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करण्याचा आपला प्रयत्न आहे. शिक्षणमंत्री तावडे हे शासकीय विश्रामगृहातून बाहेर पडत असतानाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी विश्रामगृहाबाहेर त्यांची भेट घेतली.
भाजपाच्या सरकारबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु, हे सरकार पाच वर्षे स्थिर राहीलच आणि पुन्हा हेच सरकार येईल. अमूक एका पक्षाच्या जीवावर भाजपाच्या सरकारची स्थिरता अवलंबून नाही. मी जे होणार आहे तेच बोलतो आणि जे बोलतो ते करतो, असे विनोद तावडे म्हणाले. मंत्री झाल्यानंतर राज्यात हा पहिलाच सत्कार होत आहे. फक्त सत्कारासाठी कुठेही जायचे नाही, असे आम्ही मंत्र्यांनी ठरवले आहे.
कोणताही उपक्रम असेल तर आम्ही येऊ. (प्रतिनिधी)